HOME  

पुन्हा 'सोनियां'चे दिवस आणू - आ. अमित देशमुख


पुन्हा 'सोनियां'चे दिवस आणू - आ. अमित देशमुख

उस्मानाबाद : आज देशात जे चालले ते पाहिल्यानंतर सोनियांची आठवण झाल्या शिवाय राहत नाही. कॉग्रेस सरकारने ७० हजार कोटी रूपयांची कर्जमाफी दिली होती. त्यावेळी कुणालाही त्रास झाला नाही आणि आजची कर्जमाफी पाहता ते 'सोनियाचे दिवस' आठवतात. खऱ्या अर्था़ने आता शेतकऱ्यांना न्याय हवा असेल तर राहुल गांधींशिवाय पर्याय नाही. त्यांच्या रूपाने देशात वादळ वाहतेय. राज्यात व देशात परिवर्तन घडून पुन्हा सोनियाचे दिवस आणू असा विश्वास राष्ट्रीय कॉंग्रेसचे चिटणीस युवा नेते आ. अमित देशमुख यांनी व्यक्त केला.
उस्मानाबाद येथे माजी मुख्यमंत्री काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील जेष्ठ नेते पतंगराव कदम, मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील हर्षवर्धन पाटील अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत आयोजित कॉंग्रेसच्या जनआक्रोश सभेत बोलताना त्यांनी सामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. ते म्हणाले, जनमताला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठीच ही सभा आहे. गेल्या कांही दिवसांपासून मुख्यमंत्री सांगत आहेत कर्जमाफी करणार, त्यासाठी अर्ज भरायला लावले. याद्या काढून मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रमाणित केले. म्हणजेच भाजपच्या काळात शेतकरी कर्जमाफीसाठी एक प्रकारे परिक्षाच देत आहे. ग्रिनलिस्ट म्हणजे यांची मेरीट लिस्ट आहे. पण अजुनही कुणाच्याच खात्यावर पैसा वर्ग झालेला नाही. हे पाहता सोनियाजींची आठवण आल्याशिवाय रहात नाही. ते दिवस 'सोनिया'चे दिवस होते. खऱ्या अर्थाने कॉंग्रेसने कर्जमाफी दिली होती. त्याबद्दल शेतकऱ्यांना त्रास झाला नाही किंवा तक्रारही नाही उलट स्वागत झाले. ती ऐतिहासीक कर्जमाफी ठरली. आज कर्जमाफीच्या नावावर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रोश सुरू आहे.नोकऱ्या नाहीत, व्यापार नाही, उद्योग नाहीत अशावेळी या भाजपला मतदानही नाही हे ठरविण्याची वेळ आली आहे. आज महाराष्ट्र होरपळलाय. या राज्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज आहे .भाजपची सत्ता उलटवून टाकण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. अच्छे दिन आनेवाले है, और फडणवीस जाने ले है, आम्हाला जे हवं ते दिलंच नाही. उलट नोटाबंदी, जीएसटी, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन हे जे मागितले नाही तेच दिले जातेय. शेतकऱ्यांनी शेतमालाला भाव मागितला तो मिळत नाही. उघडे असलेले धान्य खरेदी केंद्र सापडत नाही. मनमोहनसिंग यांच्या काळात सोयाबिनचा भाव ५२०० होता, तेंव्हा तेच फडणवीस, तावडे आणि खडसे ६००० रूपये भावाची मागणी करत होते. आज ते सत्तेत आहेत. सोयाबिनचा भाव कवडीमोल आहे त्यामुळे शेतमालाला खऱ्या अर्थाने भाव हवा असेल तर राहुल गांधींचे हात बळकट करण्याशिवाय पर्याय नाही.


Comments

Top