HOME   महत्वाच्या घडामोडी

राहूलच्या रुपाने पक्षात नवचैतन्य येईल - सोनिया गांधी

राहुलवर अनेक व्यक्तीगत हल्ले झाले पण खचता त्याने सहनशीलता दाखविली!


राहूलच्या रुपाने पक्षात नवचैतन्य येईल - सोनिया गांधी

नवी दिल्ली: आपल्या संवैधानिक मूल्यांवर हल्ला होत आहे. देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे देशाच्या मूल्यांचे रक्षण करणे हेच तुमचे ध्येय आहे, राहूलच्या रुपाने युवा नेतृत्व मिळाल्याने पक्षात नवचैतन्य येईल असा विश्वास सोनिया गांधी यांनी व्यक्त केला. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात सोनिया गांधी यांनी भाषण केले. अध्यक्ष या नात्याने शेवटचे भाषण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राहुल माझा मुलगा असल्यामुळे त्याचे कौतुक करणे योग्य नाही. राजकारणात राहुलवर अनेक व्यक्तीगत हल्ले झाले. पण यात खचून न जाता त्याने सहनशीलता दाखविली. त्याचा अभिमान वाटतो असेही त्या म्हणाल्या. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी राजीव आणि इंदिरा गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला. इंदिराजी सासूपेक्षा आईच होत्या. १९८४ मध्ये त्यांची हत्या झाल्यानंतर आईच आपल्यापासून हिरावून गेल्याचे वाटले. या घटनेने आयुष्यच बदलून गेल्याचे सोनियाजींनी सांगितले. पती आणि मुलांना राजकारणापासून दूर ठेवायची इच्छा होती पण इंदिराजींच्या हत्येने राजीवजींच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली. राजीवजींनी कर्तव्य समजून पंतप्रधानपद स्वीकारले. देशभर दौरे करून तेथील लोकांच्या समस्या जाणून घेतल्याचे त्या म्हणाल्या. मात्र सात वर्षांनी राजीवजींच्या हत्येनंतर आधारच हिरावून घेतल्याचे त्या म्हणाल्या. याचवेळी काँग्रेस कमकुवत होत असल्याचे जाणवल्याने राजकारणात सहभागी व्हावे असे पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटले. जबाबदारी नाकारली असती तर इंदिरा आणि राजीवजींच्या आत्म्याला दुःख झाले असते. त्यामुळेच राजकारणात आल्याचे सोनियाजी म्हणाल्या. प्रत्येक क्षणाला साथ देणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे त्यांनी यावेळी आभारही मानले. २०१४ पासून आपण विरोधी पक्षात आहोत, पण आपण घाबरणारे आणि झुकणारे नाहीत असे सोनिया यांनी ठामपणे सांगितले. काँग्रेसलाही आपल्या अंतर्मनात डोकावून पाहावे लागेल. तत्त्वे जपली नाहीत तर सामान्य लोकांचे रक्षण करता येणार नाही. कोणत्याही प्रकारचा त्याग आणि बलिदान देण्याची तयारी असायला हवी असे त्यांनी उपस्थितांना सांगितले.यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राहूल गांधींना शुभेच्छा दिल्या. प्रियंका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे देखील उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून नेते आले होते.पक्षाच्या मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. भाजप देशात हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. ते देशाला तोडण्याचा प्रयत्न करतात, पण आम्ही सर्वांना जोडतो, ते आग लावतात, आम्ही विझवतो , ते रागावतात आणि आम्ही प्रेम करतो, त्यांना रोखण्याची क्षमता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्येच आहे असे राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या पहिल्या भाषणात सांगितले. एकतेचे आणि प्रेमाचे राजकारण करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.


Comments

Top