HOME   महत्वाच्या घडामोडी

औशाच्या पाणीटंचाईवर आमदार दहा वर्ष गप्प का ?

विविध सभात भाजपा उमेदवार अभिमन्यू पवार यांचा सवाल


औशाच्या पाणीटंचाईवर आमदार दहा वर्ष गप्प का ?

औसा: औसा शहरात आज भीषण पाणीटंचाई आहे. मागच्या दहा वर्षांपासून हीच स्थिती कायम आहे. असे असताना औसा मतदारसंघाचे आमदार काय करत होते? शहरातील नागरिक पाण्यासाठी भटकत असताना आमदार गप्पा का बसले? पाणीटंचाई दूर करण्यासाठी त्यांनी उपाययोजना का केल्या नाहीत? असा सवाल महायुतीचे उमेदवार अभिमन्यू पवार यांनी उपस्थित केला.
अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी औसा शहरात आझाद चौक, संजय नगर येथे सभा संपन्न झाल्या. या सभांमध्ये पवार बोलत होते. महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, माजी आमदार दिनकरराव माने, प्रणय सावंत, सुनील उटगे, सुनील मिटकरी, मुक्तेश्वर वागदरे, भीमाशंकर राचट्टे, अरविंद कुलकर्णी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी संपर्क प्रमुख राजेंद्र मोरे, सुरेश भुरे, निसार कुरेशी, सय्यद सावकार, शिवसेनेच्या शोभा बेंजरगे, जयश्री उटगे, हिमायत पटेल, संतोष मुक्ता, कल्पना डांगे, बंडू कोदरे, राजकुमार कसबे आदींची यावेळी उपस्थिती होती. अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की, औसा शहरात पाणीटंचाई असताना आमदार या प्रश्नांवर कधीही विधानसभेत बोलले नाहीत. प्रशासकीय पातळीवर पाणीटंचाई दूर करण्यासाठी कधीही पाठपुरावा त्यांनी केला नाही. ही परिस्थिती पाहूनच मी औशात आलो. मला ही स्थिती बदलायची आहे. पाणीटंचाई पाहून मी मुख्यमंत्र्यांना शहरासाठी तेरणा प्रकल्पातून पाणी देणारी योजना मंजूर करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी त्याला तात्काळ मंजुरी देत ४५ कोटी रुपये मंजूर केले. ही योजना दोन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. पण आपण मला संधी दिली तर अवघ्या १५ महिन्यांच्या कालावधीत मी काम पूर्ण करून घेतो, अशी ग्वाही त्यांनी दिली .
दिनकरराव माने यांनी अर्ज मागे घेतला त्याच दिवशी माझा विजय स्पष्ट झाला असल्याचे सांगत पवार म्हणाले की, औसा शहरातील बसस्थानकाची निविदा प्रकाशित झाली आहे. हे काम लवकरच पूर्ण होणार आहे. शहरातील नाल्या व विद्युतीकरणाचे काम पुढील काळात गतीने करण्याचा माझा प्रयत्न आहे. शहरात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. लातूर शहराच्या अगोदर औशात कॅमेरे बसलेले आपल्याला दिसतील. सहा महिन्यांच्या आत शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न सोडवतो असे सांगून निराधारांच्या मानधनात वाढ करून देण्यासाठीही पाठपुरावा केल्याचे पवार म्हणाले. आणखी विकासकामे करण्यासाठी मला संधी द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी बोलताना राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले की, अभिमन्यू पवार यांच्या रूपाने मुख्यमंत्र्यांच्या तिजोरीची चावी औशात आली आहे. ही चावी वापरून आपल्याला औसा शहराचा आणि मतदारसंघाचा विकास साधायचा आहे. औशाला आतापर्यंत कधीच सत्त्तेत सहभागी होण्याची संधी मिळाली नाही. अभिमन्यू पवार यांच्या रूपाने ही संधी आता मिळणार आहे. यासाठी अभिमन्यू पवार यांना विजयी करून विधानसभेत पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना माजी आमदार दिनकरराव माने म्हणाले की, औसा -आलमला रस्त्याची दुरावस्था झालेली आहे . आमदारांनी केलेल्या विकासाचे हे मॉडेल आहे. या रस्त्यावरून धड चालताही येत नाही. गावागावात पाणीटंचाई असताना साधे टँकर सुरु करण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. पीकविमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. आमदार कशासाठी हवा असतो? त्याने जनतेच्या अडचणी सोडवल्या पाहिजेत पण विद्यमान आमदारांनी स्वतःच्या अडचणी सोडवून घेतल्या असेही ते म्हणाले.


Comments

Top