HOME   महत्वाच्या घडामोडी

अभिमन्यू पवारांनी भेदला चक्रव्यूह!

२६ हजाराच्या मताधिक्याने बसवराज पाटील व बंडखोरांना धोबीपछाड


अभिमन्यू पवारांनी भेदला चक्रव्यूह!

औसा: मागील दोन वर्षांपासून विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या अभिमन्यू पवार यांना राजकारणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जनतेचे पाठबळ आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या विकासकामांच्या पाठबळावर अभिमन्यू पवार यांनी हा चक्रव्यूह भेदला. औसा मतदारसंघात झालेल्या लढतीत अभिमन्यू पवार यांनी दहा वर्षांपासून आमदारकी भूषवणारे बसवराज पाटील यांना धोबीपछाड देत २६ हजाराच्या मताधिक्याने विजय मिळवला. विकासकामांच्या बळावर एक सामान्य कार्यकर्ता आमदार बनू शकतो हे त्यांनी दाखवून दिले असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
औसा मतदारसंघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीमुळे हा मतदारसंघ चर्चेत होता. अभिमन्यू पवार यांनी मागच्या दोन वर्षात औसा मतदारसंघात संपर्क वाढवत विकासकामे केली. जवळपास ३०० कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु पक्षांतर्गत विरोधामुळे शेवटच्या क्षणापर्यंत ही निवडणूक चुरशीची झाली. अभिमन्यू पवार यांना उमेदवारी मिळू नये यासाठी या गटाने प्रयत्न केला. उमेदवारी मिळाल्यानंतरही विजय मिळू नये यासाठी बंडखोरांना हवा देण्याचा प्रयत्न केला. पण हुशार जनतेने ही चाल ओळखत पवार यांना भक्कम पाठिंबा दिला. सामान्य जनता, विविध जाती-धर्मातील नागरिक आणि गोरगरीब, कष्टकरी जनतेच्या मनात निर्माण झालेले अढळ स्थान यामुळे अभिमन्यू पवार यांचा विजय सोपा झाला. कॉंग्रेसचे बसवराज पाटील आणि अभिमन्यू पवार यांच्यात झालेल्या या लढतीत पवार यांनी प्रारंभापासूनच आघाडी घेतली. शेवटपर्यंत राहिलेल्या या आघाडीत पाटील यांना एकदाही पवार यांच्यावर मात करता आली नाही. झालेल्या मतदानापैकी ५२ टक्के मते पवार यांना मिळाली. पवार यांच्या पराभवासाठी उभे करण्यात आलॆले बंडखोर आणि वंचितांच्या उमेदवाराला जनतेचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अभिमन्यू पवार यांचा विजय दृष्टीपथात येताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास प्रारंभ केला. औसा शहरातील मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूनी जमलेल्या हजारो नागरिकांनी वाद्यांच्या तालावर ठेका धरला. गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला.


Comments

Top