HOME   लातूर न्यूज

मराठा क्रांती मोर्चाची ’क्रांती दिनी’ बंदची हाक


मराठा क्रांती मोर्चाची ’क्रांती दिनी’ बंदची हाक

लातूर : मराठा क्रांती मोर्चाची लढाई आरक्षण मिळेपर्यंत सुरुच राहणार आहे. ९ ऑगस्ट रोजी ’क्रांती दिनी’ महाराष्ट्र बंद करण्याचे ठरले आहे. राज्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधून यावर शिक्कामोर्तब होईल, असा निर्णय रविवारी बैठकीत घेण्यात आला. मराठा क्रांतीभवनात झालेल्या बैठकीत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यात आतापर्यंत ५८ मोर्चे काढले; परंतु, सरकारने जाहीर केलेल्या सवलतीतून काहीच पदरी पडले नाही. शासनाने केवळ दिशाभूल करून वेळ मारून नेली आहे. त्यामुळे आता मूक मोर्चा न राहता ठोकपणे उत्तर देण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला. सरकारच्या भूमिकेचा संतप्त शब्दांत अनेक युवक कार्यकर्त्यांनी समाचार घेतला. शिवनीती (गनिमीकावा) या तंत्राने व जाहीरपणे आंदोलने करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. ९ ऑगस्ट २०१६ रोजी औरंगाबादेतून मराठा क्रांती मूक मोर्चास सुरुवात झाली होती. ’भारत छोडो, करो या मरो’ या निश्चयाचा वस्तुपाठ असलेली ऑगस्ट क्रांतीही याच दिवशी सुरु झाली होती. त्यामूळे या दिवसाचे ऎतिहासिक महत्व ओळखून महाराष्ट्र बंदसाठी हा दिवस निवडण्यात आला आहे. यासाठी राज्यातील सर्व जिल्हे, तालुक्यांतील नागरिकांना अवगत करून हे आंदोलन ऎतिहासिक करण्याचे यावेळी ठरले.


Comments

Top