HOME   लातूर न्यूज

हमीद दलवाई यांच्या कार्यावरील वृत्तचित्राचे सादरीकरण

अभिनेत्री ज्योती सुभाष, मुस्लिम सत्यशोधक डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांची उपस्थिती


हमीद दलवाई यांच्या कार्यावरील वृत्तचित्राचे सादरीकरण

लातूर: स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने गुरुवार, २७ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता दयानंद सभागृहात मानवतावादी हमीद दलवाई यांचे कार्य ह्या विषयांवर होणाऱ्या कार्यक्रमात 'हमीद : द अनसंग ह्युमॅनिस्ट ' हे वृत्तचित्र दाखविण्यात येणार असून ह्याप्रसंगी विख्यात अभिनेत्री ज्योती सुभाष आणि मुस्लिम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी हे हमीद दलवाई यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणार आहेत.
अज्ञानाच्या मध्ययुगीन अंध:कारात रुतून बसलेल्या भारतामध्ये आधुनिक विचार रुजविण्याचे कार्य अनेक सुधारकांनी केले आहे. विख्यात इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी 'आधुनिक भारताचे आधारस्तंभ' या ग्रंथात १९ शिल्पकारांची महत्ता उलगडून दाखवली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील महात्मा ज्योतिराव फुले, ताराबाई शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माधवराव गोळवलकर आणि हमीद दलवाई ह्या पाच धुरीणांच्या योगदानाविषयी विस्ताराने लिहिले आहे. मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना करून हमीद दलवाई यांनी विचारांची नाळ फुले आणि गांधी यांच्याशी जोडली होती. 'महिलांना हीन वागणूक देणाऱ्या कुप्रथा सोडून दिल्या पाहिजेत. सर्व जाती-धर्माना जोडले तरच समाजाचा गाडा सुरळीत राहून सर्वांची उन्नती होईल. 'ह्याकरिता ते सदैव आग्रही राहिले. मुस्लिम महिलांचे 'तलाक' प्रथेमुळे होणारे हाल पाहून ते कमालीचे व्यथित होत असत. त्याकडे लक्ष वेधून तो कायदा बदलावा, याकरिता त्यांनी १९६६ साली मुंबई येथे तलाक प्रथेच्या विरोधात महिलांचा मोर्चा काढण्याचे धैर्य दाखवले होते. हमीदभाई हे उत्तम लेखक व तळमळीचे सामाजिक सुधारक होते. त्यांनी मराठी व इंग्रजीमधून अनेक कथा व निबंध लिहिले आहेत. आजही अभ्यासकांना ह्या लेखनाचे संदर्भ घ्यावे लागतात. विख्यात अभिनेत्री श्रीमती ज्योती सुभाष यांनी अवघे ४५ वर्षे आयुष्य लाभलेल्या हमीद दलवाई यांच्या कार्याची महती समजावून सांगण्यासाठी 'हमीद : द अनसंग ह्युमॅनिस्ट' या वृत्तचित्राची निर्मिती केली आहे. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा व अभिनेत्री अमृता सुभाष यांचा त्यात सहभाग आहे.
स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास लातूरकरांनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीनिवास लाहोटी, श्रीमती सुमती जगताप, अतुल देऊळगांवकर आदिंनी केले आहे.


Comments

Top