HOME   लातूर न्यूज

डॉ. आंबेडकरांचे विचार संपणार नाहीत, कुणी संपवू शकणार नाही- उत्तम कांबळे


डॉ. आंबेडकरांचे विचार संपणार नाहीत, कुणी संपवू शकणार नाही- उत्तम कांबळे

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांची कृतीशिलता, त्यांची विद्वत्ता संपवणार एक गट पूर्वी होता. पण डॉ. आंबेडकर एक अजब असे रसायन होते. म्हणूनच त्यांचे विचार कोणीही संपवू शकले नाहीत आणि संपणारही नाहीत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले.
ज्येष्ठ विचारवंत, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे संस्थापक कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे लिखित ‘राष्ट्रनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या ग्रंथाचे प्रकाशन उत्तम कांबळे यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी उत्तम कांबळे बोलत होते. दयानंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी भूषवले होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गोपाळराव पाटील, माजी कुलगुरु डॉ. शिवराज नाकाडे, अ‍ॅड. मनोहरराव गोमारे, अण्णाराव पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सूर्यनारायण रणसुभे, डॉ. नागोराव कुंभार, रणजीत हालसे उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैश्विक नेते होते. त्यांचे विचार विश्वव्यापी आहेत असे नमूद करुन उत्तम कांबळे म्हणाले की, त्यांचे विचारच समाजाला तारु शकतात. विषमता संपवण्याचे काम बाबासाहेबांनी केले. जो देशाची घटना लिहितो तो एखाद्या समाजापुरता मर्यादीत राहू शकत नाही. तो कुण्या एका जातीचा नेता असू शकत नाही. तो राष्ट्राचा नेता असतो. बाबासाहेब राष्ट्रनायकच होते असे ते म्हणाले. यावेळी डॉ. गोपाळराव पाटील, अ‍ॅड. मनोहरराव गोमारे, डॉ. रणसुभे, कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. आंबेडकरांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ लिहिण्यामागे बाबासाहेबांची प्रेरणा आहे असे डॉ. जनार्दन वाघमारे म्हणाले.


Comments

Top