HOME   लातूर न्यूज

पाच दिवस अनाथांसोबत दिवाळी, ‘वसुंधरा'चा उपक्रम

अनाथालयातील मुलांना नवे कपडे, मिठाई आणि फटाके


पाच दिवस अनाथांसोबत दिवाळी, ‘वसुंधरा'चा उपक्रम

लातूर : लातूर शहरातील एकूण पाच अनाथालयात आणि पालावर जाऊन वसुंधरा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने दिवाळी उपक्रम साजरा करण्यात आला. अनाथ आश्रमातील सर्व मुला-मुलींना नवे कपडे, मिठाई, फराळ देऊन आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नवे कपडे आणि फटाके मिळाल्याने या निरागस लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून रोज एका अनाथालयात वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी साजरी करून मुलांच्या हस्ते पणत्या लावण्यात आल्या. महिनाभरापासून या उपक्रमाची जय्यत तयारी सुरू होती. मुला-मुलींना नवे उत्तम दर्जाचे कपडे, मिठाई आणि फराळ देऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. याशिवाय, या मुलांसोबत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा झाला. लातूर शहरात पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर राज्यातून आलेल्या नागरिकांच्या झोपडीत आणि पालावर जाऊन त्यांच्या मुलांना नवे कपडे आणि मिठाई देण्यात आली. लातूर शहरातील सावली अनाथालय, अनाथ मुलींचे निरीक्षण गृह, शारदा सदन आश्रमशाळा आदी ठिकाणच्या लेकरांसोबत हा दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यात आला. अनेक दानशूर लोकांनी या उपक्रमाला सहकार्य केले असून लोकसहभागातून मागच्या तीन वर्षांपासून वसुंधरा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने अनाथांसोबत दिवाळी साजरी करण्यात येत असून या उपक्रमाचे नागरिकांच्या वतीने कौतुक होते आहे.
मुलींचे निरीक्षण गृह येथे साजऱ्या करण्यात आलेल्या दिवाळी उपक्रमात सिनेअभिनेते सचिन दानाई यांनी सहभाग नोंदवून अनाथ मुलींसोबत दिवाळी साजरी करून फटाके फोडले. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, उमाकांत मुंडलीक, रामेश्वर बावळे, अमोल स्वामी, अमर साखरे, अजय साठे, हुसेन शेख, प्रशांत स्वामी, प्रिया माळी, सागर मलवाडे आदींची उपस्थिती होती. माणूस म्हणून जगताना इतरांना आनंद देण्याचे भाग्य आम्हास लाभले असून दरवर्षी अनाथांसोबत दिवाळी साजरी करणार असून यंदा ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले आहे त्यांचे आभार प्रा.योगेश शर्मा यांनी मानले आहेत.


Comments

Top