HOME   लातूर न्यूज

बिदर-मुंबई रेल्वेला मुरुड येथे थांबा

मुख्यमंत्र्यांची मुरूडकरांना दिवाळी भेट- अभिमन्यू पवार


बिदर-मुंबई रेल्वेला मुरुड येथे थांबा

लातूर : बिदरहून लातूर मार्गे मुंबईला जाणाऱ्या रेल्वेला मुरुड येथे थांबा द्यावा अशी त्या परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे शब्द टाकल्यानंतर त्यांनी ही मागणी तात्काळ मंजूर केली. या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुरुडसह लातूर जिल्ह्यातील जनतेला दिवाळीची भेट दिली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी दिली.
बिदर-मुंबई रेल्वे हा लातूर जिल्ह्यातील जनतेसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. विविध कामांसाठी मुंबई येथे नागरिकांना जावे लागते. अशावेळी मुरुड व परिसरातील जनतेला लातूर किंवा इतर ठिकाणाहून रेल्वेत बसावे लागत होते. मुरुड हे लातूर तालुक्यातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र असल्याने येथे रेल्वेला थांबा असावा अशी मागणी नागरिक अनेक दिवसांपासून करत होते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडेही निवेदने देण्यात आली होती. याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे मुरुड येथे रेल्वेला थांबा द्यावा अशी मागणी केली होती. या संदर्भात यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कित्येक नागरिक नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबई व परिसरात राहत असल्याचे म्हटले होते. या नागरिकांना आपल्या गावाकडे जाण्या-येण्यासाठी ही एकमेव रेल्वे आहे. या नागरिकांना रेल्वेतून प्रवास करता यावा यासाठी मराठवाडा जन विकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे व भाजपाचे पदाधिकारी हनुमंत नागटिळक यांनी निवेदन देऊन रेल्वेला मुरुड येथे थांबा द्यावा अशी मागणी केल्याचा उल्लेख केला होता. या पत्राची दखल घेऊन रेल्वेमंत्र्यांनी ही मागणी मंजूर केली आहे. मुरुड येथे थांबा मिळावा यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी मुरुडसह परिसरातील जनतेला दिवाळीची भेट दिली असल्याचे अभिमन्यू पवार यांनी सांगितले
लवकरच खा. डॉ सुनिल गायकवाड यांच्या हस्ते मुरूड येथुन या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे. मुरुड येथे रेल्वेचा थांबा मंजूर केल्याबद्दल अभिमन्यू पवार यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे आभार मानले आहेत.


Comments

Top