HOME   लातूर न्यूज

लातूरला लवकरच स्वतंत्र विद्यापीठ

खासदारांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद


लातूरला लवकरच स्वतंत्र विद्यापीठ

लातूर: लातूरला लवकरच स्वतंत्र विद्यापीठ होणार असून या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यासाठी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने लवकरच स्वतंत्र विद्यापीठाची घोषणा होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
शैक्षणिक पंढरी म्हणून ओळख असलेल्या लातूरने शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेचा लातूर पॅटर्न निर्माण केला आहे. लातूरला शैक्षणिक वातावरण चांगले आहे. येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी असल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या बाबतीत छोटा जिल्हा असतानाही लातूरला महाविद्यालये व विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. सध्या लातूर जिल्हा नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित आहे. लातूरमध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू आहे. याची इमारत भव्यदिव्य आहे. प्रत्येक कामासाठी नांदेडला चकरा माराव्या लागत आहेत. हे टाळण्यासाठी येथील नागरिकांच्या मागणीनुसार खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे स्वतंत्र विद्यापीठाची मागणी निवेदनाद्वारे केली. यासाठी त्यांनी वारंवार पत्रव्यवहार केला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक लातूरचे सुपुत्र अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. याची दखल घेत मुख्यमंत्री व शिक्षण विभागाच्या कार्यालयाकडून लातूरला स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची आशा आहे. यामुळे लातूरकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्णत्वास येणार आहे.


Comments

Top