HOME   लातूर न्यूज

श्रेय राहुल गांधी यांना, परिवर्तनाच्या प्रक्रियेत महाराष्ट्रही आघाडीवर

आमदार अमित देशमुख यांची प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा


श्रेय राहुल गांधी यांना, परिवर्तनाच्या प्रक्रियेत महाराष्ट्रही आघाडीवर

लातूर: देशातील पाच राज्यांच्या लागलेल्या निवडणूक निकालात काँग्रेस पक्षाने ऐतिहासिक कामगिरी बजावली असून या यशाचे सारे श्रेय राहुल गांधी यांच्या उगवत्या नेतृत्वाकडे जाते. आजच्या निकालातील यश हे राहुल गांधी यांनी घेतलेले अपार कष्ट, काँग्रेस कार्यकर्त्यांवर दाखवलेला मोठा विश्वास आणि लोकशाहीच्या मार्गाने जाण्याची त्यांनी स्विकारलेली सुसंगत भूमिका याचे हे फलित आहे अशी प्रतिक्रिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिली आहे.
आमदार अमित देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, केंद्र आणि राज्यांमधील भाजप सरकारची कामगिरी समाधानकारक नसल्याने सामान्य जनतेचा उडालेला विश्वास मतदारांनी मतदानातून व्यक्त केला आहे. सत्ता आणि पैसा या साधनांचा वापर करुनही भाजपशासित राज्यांतील मतदारांनी त्यांना स्वीकारले नाही. यामुळेच तेथे काँगेसचा पर्याय दिला, श्री. राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षातील नव्या-जुन्यांची एकत्र सांगड घालून मजबूत फळी उभी केली आणि भाजपला जोरदार धक्का दिला. पक्षातील ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत, कमलनाथ, सचिन पायलट त्याचप्रमाणे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसचा संदेश लोकांपर्यंत नेला आणि भाजपचे अपयश उजागर केले. सामान्य मतदारांना भाजपने नेहमीच गृहित धरले होते. मतदारांनी त्यांना त्यांची जागा आता दाखवून दिली आहे. श्रीमती सोनिया गांधी यांचेही अभिनंदन करावयास हवे. त्यांनी दाखविलेल्या मोठ्या विश्वासामुळे राहुल गांधी यांची भरारी सार्थक ठरली आहे. काँग्रेस पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी या यशासाठी मोठे परिश्रम घेतले त्यांना मानाचा मुजरा करावा लागेल. या निकालावरुन देशातील बदलती हवा लक्षात घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांना निश्चितपणे स्फूर्ती मिळेल आणि ते जोरदारपणे कामाला लागतील. परिवर्तनाच्या या प्रक्रियेत महाराष्ट्रही मागे राहणार नाही असा विश्वासही आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे.


Comments

Top