HOME   लातूर न्यूज

मित्र सोबत आला तर ठीक नाही तर त्यालाही आसमान दाखवू

अमित शाह यांचा इशारा, मुख्यमंत्री म्हणतात राज्यातल्या ४० जागा जिंकू


मित्र सोबत आला तर ठीक नाही तर त्यालाही आसमान दाखवू

लातूर: आगामी काही दिवसात लोकसभेची निवडणूक होणार आहे. २०१९ या वर्षात होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागुन आहे. या निवडणुकीत भाजपाच विजयी होणार आहे, त्यासाठी तयारीला लागा. आगामी निवडणूक ही पानिपतची लढाई आहे. पानिपतच्या लढाईत पराभूत झाल्यानंतर देश २०० वर्ष गुलामीत राहिला. आता ही निवडणूक जिंकली तर पुढील ५० वर्ष आपल्या विचाराची सत्ता राहील. यासाठी कामाला लागा, मित्रपक्ष सोबत आला तर ठीक अन्यथा त्यालाही धोबीपछाड दाखवू असा इशारा देत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र दिला. तर राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४० जागा जिंकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
अमित शहा यांच्या उपस्थितीत लातुरसह उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघातील बुथ प्रमुख आणि शक्तीकेंद्र प्रमुखांचा मेळावा थोरमोटे लॉंस येथे संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना शहा बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुनिल गायकवाड, प्रदेश सरचिटणीस आ. सुरजीतसिंह ठाकूर, संघटनमंत्री विजय पुराणिक यांची उपस्थिती होती.
फिर एक बार मोदी सरकार या घोषणेसह बूथ विजय संमेलन कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्याना स्फूर्ती देताना अमित शहा म्हणाले की, भाजपा हा शांतपणाने आपले काम करणारा पक्ष आहे. विजयाने आम्हाला अहंकार येत नाही तर पराभवाने आम्ही घाबरत नाही. १० सदस्यानी स्थापन झालेल्या भाजपाचे आज ११ कोटी सदस्य आहेत. १६ राज्यात भाजपाची सरकारे आहेत. देशातील ९१ टक्के शक्ती केंद्रात भाजपाचे कार्यकर्ते आहेत. पक्ष देशभर पसरलाय. त्यामुळे आपला विजय नक्की असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्रात आज युती आहे. भविष्यात युती झाली तर सहकाऱ्याला विजयी करू पण युती झाली नाही तर त्याच सहकाऱ्याला पराभूत करू असे सांगत शहा यांनी युतीबाबत आपली भुमिका स्पष्ट करतानाच स्वबळावर लढण्याची तयारी करण्याच्या सुचना केल्या. महागठबंधन होणार अशी हवा केली जात आहे पण या आघाडीत असणारे पक्ष त्या त्या राज्यात मर्यादित आहेत . देशपातळीवर त्यांना कोणी विचारत नाही. मागच्या वेळी आम्ही उत्तर प्रदेशात ७३ जागा जिंकल्या होत्या यावेळी सपा व बसपा एकत्र लढले तरी ७४ जागा जिंकू असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकारचे काम चांगले आहे. या सरकारांनी राबवलेल्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, त्यांच्याशी संवाद साधा, आपला विजय नक्की आहे असेही अमित शहा म्हणाले .
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की २०१९ चा विजय हा २०१४ पेक्षाही मोठा असेल.तुम्ही युतीची चिंता करू नका. आपल्याला स्वतःच्या ताकदीवर जिंकायचे आहे. मागच्या वेळी १२२ जागा जिंकल्या होत्या. दिड कोटी मते घेतली होती. स्वबळासाठी ०२ कोटी मतांची आवश्यकता आहे. आपले लाभार्थी त्यापेक्षा जास्त आहेत असेही ते म्हणाले .
प्रास्ताविकात पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातुरात कोणाच्याही मदतीशिवाय सत्ता स्थापन करू शकतो हे दाखवून दिले आहे. कार्यकर्त्यांच्या बळावरच हे यश मिळाल्याचे ते म्हणाले.


Comments

Top