HOME   लातूर न्यूज

ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी २५० कोटींचा निधी

चाकूर -गुलबर्गा रेल्वेमार्गाचा प्रश्न मार्गी- ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे


ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी २५० कोटींचा निधी

लातूर: राज्यातील ज्या ग्रामपंचायतीना स्वत:च्या इमारती नाहीत अथवा इमारती जीर्ण झाल्या आहेत, अशा सर्व ग्रामपंचातींना ग्राम विकास विभागाकडून नवीन इमारत बांधण्यासाठी २५० कोटीचा निधी मंजूर केला असून या माध्यमातून गाव विकासाच्या कामाला अधिक गती मिळणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास आणि महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चाकूर येथील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी केले.
यावेळी अध्यक्षस्थानी कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पूर्नवसन, व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते. तसेच आमदार सर्वश्री विनायक पाटील, सुधाकरराव भालेराव, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता निला यांच्यासह इतर मान्यवर व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ३० हजार कि.मी. चे ग्रामीण रस्त्यांची कामे सुरु असून या कामांसाठी निधीची कमतरता नाही. त्याचप्रमाणे राज्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण केले जात असून ग्रामीण रस्ते व महामार्गामुळे ग्रामीण व शहरी भागाच्या विकास अधिक गतीने होणार आहे, असे ग्राम विकास मंत्री मुंडे यांनी सांगितले. शासनाने मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी विविध उपाय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन मुलींचा घसरलेला जन्मदरात वाढ केली आहे. हे शासन फक्त इमारती, रस्ते या विकास कामांबरोबरच सामाजीक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्रीमती मुंडे यांनी सांगितले.
लातूर जिल्हयातील सर्व महसूल मंडळे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलेली असून जिल्हयात सर्वत्र दुष्काळाच्या उपाययोजना लागू झाल्या आहेत. परंतु लातूर जिल्हा कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री निलंगेकर यांनी केले. त्याप्रमाणेच चाकूर ते गुलबर्गा व नांदेड ते लातूर हे रेल्वेमार्गाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी आमदार विनायक पाटील यांनी अहमदपूर विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांची माहिती देऊन या भागाच्या विकासासाठी आणखी निधी देण्याची मागणी केली. प्रारंभी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते अहमदपूर चाकूर तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत २१६ कि.मी. लांबीच्या रस्त्यासाठी १२१ कोटी रुपयांच्या तर मुलभूत सुविधा योजनेंतर्गत साडे पाच कोटीच्या विकास कामांचे ई-लोकार्पण व भूमीपूजन व्यासपीठावरुन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघराज बाहेती यांनी केले तर आभार सुधाकरराव श्रृंगारे यांनी मानले.


Comments

Top