HOME   लातूर न्यूज

काँग्रेसच जनतेला सच्चे दिन मिळवून देईल

धीरज देशमुख यांनी व्यक्त केला आत्मविश्वास


काँग्रेसच जनतेला सच्चे दिन मिळवून देईल

लातूर: अच्छे दिनचे स्वप्न दाखवून देशात व राज्यात भाजपवाल्यांनी सत्ता मिळवली मात्र जनतेला दाखवलेले स्वप्न ते पूर्ण करू शकले नाही त्यामुळे अच्छे दिन हा शब्द उच्चारताच जनता आता चिडत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष जनतेला खऱ्या अर्थाने विकासाचे सच्चे मिळवून देईल असा आत्मविश्वास जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांनी व्यक्त केला आहे. मौजे चिंचोली राव तांडा लातूर येथे सभागृह व तांडा वस्ती सुधार योजनेतून मंजूर झालेल्या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. त्र्यंबक भिसे, लालासाहेब चव्हाण, विजय देशमुख, तात्यासाहेब देशमुख, श्रीनिवास शेळके, साजीद शेख माजी संचालक मांजरा शे.स.सा.कारखाना, पांडूरंग सुर्यवंशी, रावसाहेब मुळे, पंडीतराव आडसुळे, पांडूरंग पांढरे, कल्याणराव जाधव, लक्ष्मण चव्हाण माजी उपसभापती, गुरुनाथ गवळी, महेंद्र मुळे, सरपंच पारुबाई जाधव, उपसरपंच गोपाळ दरेकर वसंतराव शिंदे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना धीरज देशमुख म्हणाले की अच्छे दिन हे केवळ भाजपवाल्यांसाठी असून सामान्य जनतेला विकास काय असतो हे त्यांनी दाखवून दिले नाही. याउलट देशाची बिकट परिस्थिती भाजपच्या कारभारातून निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षाचे ध्येयधोरण ही सतत विकासाभिमुख राहिल्या आहेत. याच धोरणावर चालताना लोकनेते विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याचा कायापालट केला. साखर कारखानदारी निर्माण करून आर्थिक उन्नतीचे नवे पर्व सुरू केले जिल्हा परिषद
सदस्य या नात्याने जास्तीत जास्त निधी आपल्या मतदार संघात कशा पद्धतीने आणता येईल याकडे नेहमीच आपला कल राहिला असून जनतेच्या प्रश्नासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे धीरज देशमुख म्हणाले. यावेळी आ. त्र्यंबक भिसे यांनी आपल्या मनोगतातून शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होत असल्याचे सांगून जनतेने भाजप सरकारला धडा शिकवून विकासाची कास धरून चालणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या पाठीशी येणाऱ्या निवडणुकीत खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.


Comments

Top