HOME   लातूर न्यूज

कचरा प्रक्रिया केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नगरसेवक शिवकुमार गवळी यांनी उभारला अभिनव कचरा प्रक्रिया प्रकल्प


कचरा प्रक्रिया केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

लातूर: शहराला कचर्‍याची समस्या भेडसावत असताना युवा नगरसेवक शिवकुमार गवळी यांच्या संकल्पनेतून कचरा संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया व खत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. एकाच ठिकाणी सर्व प्रक्रिया होणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असून याचे लोकार्पण पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सोमवारी (दि ११) होणार आहे.
काही वर्षांपासून लातूर शहराला कचर्‍याची समस्या भेडसावत आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. नगरसेवक शिवकुमार गवळी यांनीही आधुनिकतेची कास धरत शहराला या समस्येपासून मुक्तता देण्यासाठी अभ्यास केला. इतर शहरांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर इंदौर येथील प्रकल्पाची त्यांनी पाहणी केली. असाच प्रकल्प लातुरात उभारण्यासाठी पाठपुरावा केला. गतवर्षी स्वछता मोहिमेवेळी जिल्हाधिकारी तथा तत्कालीन पालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्याशी चर्चा करून कचरा संकलन केंद्राचा प्रस्ताव दिला होता. हा प्रकल्प पूर्णत्वास आला असून सोमवारी या केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
शासकीय कॉलनीत ४० बाय १०० फूट जागेत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या बंदिस्त केंद्रात कन्वेयर बेल्ट, श्रेडर, कॉम्पॅक्टर यासारखी अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसवण्यात आली आहे. शहरातील कचरा संकलित केल्यानंतर त्याचे वर्गीकरण करणे, ओला व सुका असे वर्गीकरण करतानाच त्यातून प्लास्टिक, धातू व इतर घटक वेगळे करून त्यावर स्वतंत्रपणे प्रक्रिया केली जाणार आहे. कचर्‍यावर प्रक्रिया केल्यानंतर तयार होणारा खत नागरिकांच्या घरोघरी मोफत दिला जाणार आहे. शहरातील किमान ४० टक्के कचर्‍यावर प्रक्रिया होणार असल्याने कचरा डेपोवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. प्रभाग ११ सह प्रभाग १२ व प्रभाग १३ मधील कचर्‍यावरही या प्रकल्पात प्रक्रिया होणार आहे. विशेष म्हणजे संकलन केंद्रात सॅनिटरी नॅपकीन पासुन होणारे प्रदुषण कमी करण्यासाठी विघटन करणारी यंत्रणाही लवकरच उभारली जात आहे. नगरसेवक शिवकुमार गवळी यांच्या संकल्पनेतून अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू होत असल्याने शहरातील कचर्‍याची समस्या दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.


Comments

Top