HOME   लातूर न्यूज

पद्मभूषण डॉ. कुकडे यांचा २५ रोजी नागरी सत्कार

विविध समित्या स्थापित, मान्यवरांचा सहभाग


पद्मभूषण डॉ. कुकडे यांचा २५ रोजी नागरी सत्कार

लातूर, दि. ११ : लातूर येथील ज्येष्ठ शल्यचिकित्सा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ स्वयंसेवक डॉ. अशोकराव कुकडे यांना भारत सरकारने नुकताच पद्मभूषण पुरस्कार घोषित केला आहे. हा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल लातूर शहरात सोमवार, २५ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी साडेचार वाजता डॉ. कुकडे व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे
या नागरी सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, पद्मविभूषण डॉ. के.एच. संचेती, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक तथा लातूरचे सुपुत्र डॉ. कैलाश शर्मा, पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. डॉ. सुनील गायकवाड, आ. अमित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. डॉ. कुकडे काकांना पद्मभूषण पुरस्कार घोषित झाल्याबद्दल आणि डॉ. सौ ज्योत्स्ना कुकडे यांना एसएनडीटी विद्यापीठाने डी. लिट. पदवी देऊन सन्मानित केल्याबद्दल या उभयतांचा हा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे
या सत्काराच्या पार्श्‍वभूमीवर नुकतेच लातूर येथील डॉ. भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात सर्वपक्षीय पदाधिकारी व सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वसंमतीने या नागरी सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष म्हणून लातूरचे ज्येष्ठ विधिज्ञ व ज्येष्ठ समाजवादी नेते अ‍ॅड. मनोहरराव गोमारे यांची निवड करण्यात आली .या बैठकीत डॉ. कुकडे यांच्या सत्कार सोहळ्याच्या नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या सत्कार सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अ‍ॅड. गोमारे यांनी एक समिती गठित केली असून, या समितीत राज्य साक्षरता परिषदेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, कृषीरत्न बी. बी. ठोंबरे, लातूर मनपाचे महापौर सुरेश पवार, मनपा स्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सामाजिक कार्यकर्त्या कुमुदिनी भार्गव, डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, ललितभाई शहा, नितीन शेटे, डॉ. गिरीश मैदरकर, निलेश ठक्कर, मकरंद जाधव शिवदास मिटकरी, निसारभाई विंधानी, संजय कांबळे, योगेश करवा, यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे. या बैठकीत सत्कार समितीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीचे वितरणही करण्यात आले. डॉ. अशोकराव कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार घोषित झाल्याने लातूर जिल्ह्यांतील सर्वच क्षेत्रातील नागरिकांना अतिशय आनंद झाला असून सर्वजण हा सोहळा डॉ. कुकडे काकांच्या कार्याला साजेल असा व्हावा, या उद्देशाने कामाला लागले आहेत. या सोहळ्याबाबतच्या व्यवस्था समित्या लवकरच जाहीर केल्या जाणार असल्याचे मनोहरराव गोमारे यांनी सांगितले. या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात हजारोंच्या नागरी सत्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून लातूरचे भूषण असणाऱ्या डॉ. कुकडे काकांच्या या सत्कार सोहळ्यात सर्वच स्तरांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अजून या कार्यक्रमाचे स्थळ ठरायचे आहे.


Comments

Top