HOME   लातूर न्यूज

जिल्हा परिषदेच्या शाळा मजबूत करणार- पालकमंत्री

जिल्हा परिषदेच्या वतीने २० शिक्षकांना पुरस्कार प्रदान, प्रा. गुंदेकरांचा विशेष गौरव


जिल्हा परिषदेच्या शाळा मजबूत करणार- पालकमंत्री

लातूर: जिल्हा परिषदेच्या शाळेत देश भावना शिकविली जाते. जिल्हा, राज्य आणि देश घडविण्यातही जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वाटा मोठा आहे. बदलत्या काळानुसार या शाळांना विविध सुविधा उपलब्ध करुन देतानाच जिल्हा परिषदेच्या शाळा अधिक मजबूत करु असे प्रतिपादन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेंकर यांनी केले. जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळयात प्रमुख पाहूणे म्हणून पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष मिलिंद लातूरे तर प्रमुख पाहूणे म्हणून खा. सुनिल गायकवाड, आ. सुधाकर भालेराव, महापौर सुरेश पवार यांच्यासह मंचावर उपाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रामचंद्र तिरुके, बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, कृषी सभापती बजरंग जाधव, महिला व बालकल्याण सभापती संगीता घुले, सभापती संजय दोरवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे, उप मुख्यकार्यकारी अधिकारी केंद्रे, शिक्षणाधिकारी नसरुद्दीन शेख उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, शिक्षक हा आदर्शच असतो. पुरस्कार देणे हे केवळ प्रोत्साहन आहे. सध्याचे भाजपा सरकार तत्वावर चालणारे सरकार आहे. यापूर्वी विकास केल्याचे सांगितले जाते. परंतू इमारती उभारणे हीच केवळ विकासाची भाषा होती. काम करताना माझ्यावरही टिका होते परंतू मी कामातूनच त्याला उत्तर देतो. शिक्षकांचे अनेक प्रश्‍न आहेत. बदलीच्या विषय संवेदनशील आहे त्याबाबत योग्य विचार केला जाईल. एकाही शिक्षकावर अन्याय होणार नाही. प्रत्येकाला चांगल्या ठिकाणी कामाची संधी मिळावी यासाठी बदल्याचे सुत्र बदलले जाईल असे आश्‍वासनही त्यांनी दिले. पुरस्कार प्राप्त शिक्षक कविता सूर्यवंशी, सुनिल मुळे यांच्यासह विशेष पुरस्कार मिळालेले श्रीराम गुंदेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. श्रीराम गुंदेकर यांना देविसिंह चौहान आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार यावर्षी नव्यानेच सुरुवात करण्यात आला आहे. यावेळी दयानंद कोळसुरे, निर्मला सूर्यवंशी, सूनिता सोनवतीकर, दयानंद मठपती, दिलीप कापसे, शांतकुमार बिरादार, सूर्यकांत मोतेवार, शंकर स्वामी, कविता सूर्यवंशी, गणपत गादगे,विनायक दराडे, सुनिल मुळे, दत्तात्रय गिरी, संजू रोडगे, रणजित लांडगे, नंदकुमार कोनाळे, राजेंद्र नलवाड, बालाजी काकडे, सच्चिदांनद पुट्टेवाड व लक्ष्मण नामवाड यांना शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.


Comments

Top