HOME   लातूर न्यूज

बालदिनी धीरज देशमुख यांनी केल्या जिल्हा परिषदेच्या तीन शाळा प्रकाशमान


बालदिनी धीरज देशमुख यांनी केल्या जिल्हा परिषदेच्या तीन शाळा प्रकाशमान

लातूर तालुक्यातील एकुर्गा, भोयरा आणि अंकोली जिल्हा परिषद शाळांच्या वीजेचे बील थकलेले आहे. एकुर्गा व अंकोली शाळेचे फेब्रुवारी २०१५ पासूनचे विज बील थकीत आहे. त्यामुळे महावितरणे दोन महिन्यांपुर्वी या तिन्ही शाळांची विजजोडणी तोडली होती. त्यामुळे या शाळांतील चिमुकल्यांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेत लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख यांनी बालदिनी १४ नोव्हेंबर रोजी सदरील तिन्ही शाळांचे वीज बील अदा करुन बालकांना अनोखी भेट दिली. धीरज देशमुख यांच्या सहकार्याने सदरील तिन्ही शाळा प्रकाशमान झाल्या आहेत.
एकुर्गा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत १४२ मुली, १२७ मुले, भोयरा येथील जिल्हा परिषद शाळेत ११९ मुली, १०६ मुले, अंकोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ११८ मुली, १११ मुले असे तिन्ही शाळेत ३६९ मुली, ३४४ मुले असे एकूण ७२३ मुली, मुलं शिक्षण घेतात. परंतु एकुर्गा जिल्हा परिषद शाळा व अंकोली जिल्हा परिषद शाळेचे विजबील फेब्रुवारी २०१५ पासून थकीत होते. मध्यंतरी काहीं महिन्यांचे वीज बील भरुन विजपुरवठा पुर्ववत करुन घेण्यात आला होता. मात्र दोन महिन्यांपूर्वी सदरील शाळांचा विजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यामुळे सदरील तिन्ही शाळांमधील संगणक विभाग बंद होता. परिणामी विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण घेता येत नव्हते. इतकेच नव्हे तर विजजोडणी तोडल्यामुळे या शाळांमध्ये अंधार होता. त्याकडे कोणी लक्षही द्यायला तयार नव्हते.
आजची लहान मुलं उद्याची तरुण पिढी आणि तरुण पिढी हेच देशाचे बलस्थान अशी पंडित नेहरु यांची विचारसरणी होती. या विचारसरणीला अनुसरुन धीरज देशमुख यांनी एकुर्गा, भोयरा आणि अंकोली जिल्हा परिषद शाळांचे थकीत वीज बील स्वत: अदा करुन उद्याची तरुण पिढी सक्षमपणे उभी राहिली पाहिजे, यासाठी योगदान दिले. बालदिनी बालकांना धीरज देशमुख यांनी दिलेल्या या अनोख्या भेटीने शाळेतील मुलं आनंदीत तर झालीच शिवाय एकुर्गा, भोयरा आणि अंकोली येथील ग्रामस्थांनीही त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.


Comments

Top