HOME   लातूर न्यूज

रयतेचे राज्य हीच शिवरायांना आदरांजली- अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

भारतीय संविधान ग्रंथाचे वाटप, शिवसंस्कृती प्रतिष्ठानने केले शिवजन्मोत्सवाचे उद्घाटन


रयतेचे राज्य हीच शिवरायांना आदरांजली- अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

लातूर: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतांना राजे रयतेसाठी लढले हे विसरता कामा नये. शिवजयंती साजरी करीत असतांना पुन्हा एकदा रयतेचे राज्य रहावे हीच छत्रपती शिवरायांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. लातूर येथील शिवसंस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून गुरुवारी शिवाजी चौकात भारतीय संविधान वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संविधान वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी २०१८ च्या शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अमन शेख हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिग्दर्शक विश्वजित रांजणकर, युवा भीम सेनेचे संस्थापक पंकज काटे, बालाजी रांजणकर, केशव राऊत, शिवसंस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर घोलप, उपाध्यक्ष नितीन शिंदे, सचिव अमित तिकटे, मारुती तिकटे, सुधन्वा पत्की आदींची उपस्थिती होती. यावेळी आपले विचार व्यक्त करतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भारतीय संविधान प्रस्तुत करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोक, महाराणा प्रताप व छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशल नेतृत्व कौशल्याचे स्मरण केले होते. त्याकाळी सुद्धा जातीपातीच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. छत्रपतींची कार्यपद्धती सर्वसमावेशक, सर्वांना सोबत घेऊन चालणारी होती. म्हणूनच छत्रपतींना आपण रयतेचे राजे असे संबोधतो. आजच्या समाजाने इतिहासात अडकून न पडता वास्तवतेकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
शिवकाळात एखादेवेळी निसर्गाने साथ दिली नाही तर सर्व कर माफ केला जात असे. आजही अवकाळी, गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांनाही सरकारने भरीव मदत केली पाहिजे. छत्रपतींच्या गनिमी काव्याची आपण आजही कौतुकाने चर्चा करतो. आपल्या देशात अनेक राजे होऊन गेले पण महाराजांचे नांव आपण कायम स्मरणात ठेवतो. आधुनिक काळात रयतेची गुलामी संपवण्याचे काम राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केल्याचेही त्यांनी सांगितले.
विश्वजित रांजणकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना शिवसंस्कृती प्रतिष्ठान महाराष्ट्रातील असे एकमेव प्रतिष्ठान आहे, ज्यांनी भारतीय संविधानाचे वाटप करून शिवजयंती साजरी करत असल्याचे सांगितले. समाजात वावरणाऱ्या सामान्य लोकांना कायद्यांची माहिती मिळावी, त्यांना कायद्याचे ज्ञान संपादन करणे सहज शक्य व्हावे म्हणून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यमान केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप करून आता खऱ्या अर्थाने सामाजिक समता प्रस्थापित करावयाची असेल तर रयतेच्या राज्याचीच आवश्यकता असल्याचे रांजणकर यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किरण माने यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत गजभार यांनी केले.


Comments

Top