HOME   लातूर न्यूज

शिवरायांविषयी अपशब्द काढणार्‍याला तडीपार करावे: तृप्ती देसाई


शिवरायांविषयी अपशब्द काढणार्‍याला तडीपार करावे: तृप्ती देसाई

लातूर: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रत्येकास परम आदर आहे. शिवराय आपले प्रेरणास्थान, स्फूर्तिस्थान आहेत. त्यांच्याविषयी ज्यांनी कुणी अपशब्द काढला असेल अशावर थेट तडीपारीची कारवाई केली जावी, असे प्रतिपादन भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी केले. येथील शिवसंस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीच्या अनुषंगाने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून शिवाजी चौकात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या हस्ते संविधान वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, ब्रिगेडच्या मराठवाडा अध्यक्षा राजश्री पाटील, संध्याताई कासार, दिग्दर्शक विश्वजित रांजणकर , शिवसंस्कृती प्रतिष्ठानच्या सन २०१८ च्या शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अमन शेख , शिवसंस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर घोलप, उपाध्यक्ष नितीन शिंदे, सचिव अमित तिकटे, वैशाली गायकवाड, शिला वाघमारे, कांतीलाल गवारे, अनंतेश टेंकाळे, प्रा. किरण माने, बालाजी रांजणकर, केशव राऊत, मारुती तिकटे, प्रशांत गजभार आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिवसंस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने शिव जन्मोत्सवाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. संविधान वाटप करून सामान्य नागरिकांमध्ये कायद्याप्रती जागरूकता निर्माण करण्याचा स्तुत्य व सांघिक प्रयत्न प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सुरु केला आहे.
यावेळी बोलताना तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या की, लातुरातील शिवजंयतीचा उत्साह पाहून आपण प्रभावित झालो आहोत. लातूर शहरातील भगवे वातावरण पाहून आपण पुण्यात आलो आहोत की काय असे क्षणभर आपणास वाटले. शिवसंस्कृती प्रतिष्ठानने संविधान वाटपाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. लोकशाही प्रणालीत प्रत्येक व्यक्तीने कायद्याचा मान राखला पाहिजे. छत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाबद्दल शंका उपस्थित करण्याचा, त्यांच्याविषयी अपशब्द उच्चारण्याचा अधिकार कोणालाही नाही असे प्रतिपादनही देसाई यांनी यावेळी केले.


Comments

Top