HOME   लातूर न्यूज

नवनिर्माण व्याख्यानमालेस शुक्रवारपासून प्रारंभ, चाकूरकरांची प्रकट मुलाखत

२३ ते २६ फेब्रुवारी या काळात विवेक घळसासी व डॉ. शुभा साठे यांचे व्याख्यान


नवनिर्माण व्याख्यानमालेस शुक्रवारपासून प्रारंभ, चाकूरकरांची प्रकट मुलाखत

लातूर: नवनिर्माण प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे समाजप्रबोधनाच्या दृष्टीकोनातून नवनिर्माण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी शुक्रवार दि. २३ फेब्रुवारीपासून तीन दिवशीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. २३, २४ व २६ फेब्रुवारी रोजी होणार्‍या या व्याख्यानमालेत माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांची प्रकट मुलाखत वज्येष्ठ पत्रकार विवेक घळसासी आणि वि. दा. सावरकर यांच्या जीवन चरित्र्याच्या अभ्यासिका डॉ. शुभा साठे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेस जास्तीत जास्त लातुरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नवनिर्माण प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रविण सरदेशमुख यांनी केले आहे.
प्रतिवर्षी नवनिर्माण प्रतिष्ठानच्या वतीने लातुरकरांना बौध्दिक मेजवाणी देऊन समाजप्रबोध करण्याकरिता नवनिर्माण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सदर व्याख्यानमाला दि. २३, २४ व २६ फेब्रुवारी रोजी दयानंद महाविद्यालयाच्या दयानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहे. शुक्रवार दि. २३ फेब्रुवारी रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री तथा राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांची प्रकट मुलाखत सायंकाळी ६ ते ९ या दरम्यान घेण्यात येणार आहे. माझा कौटूंबिक, सामजिक, राजकीय, राष्ट्रीय व अध्यात्मिक जिवन प्रवास या विषयावर होणार्‍या या मुलाखतीच्या अध्यक्षपदी विवेकानंद रुग्णालयाचे डॉ. अशोक कुकडे उपस्थित राहणार आहेत. दै. लोकसत्ताचे खास प्रतिनिधी सुहास सरदेशमुख, महाराष्ट्र टाईम्स व सह्याद्री वाहिनीचे प्रतिनिधी अरुण समुद्रे, विवेकानंद रुग्णालयाचे डॉ. महेश देवधर व शामराव पाटील विद्यालयाचे प्रा. डॉ. जगन्नाथ पाटील ही मुलाखत घेणार आहेत.
ज्येष्ठ पत्रकार व निरुपणकार विवेक घळसासी यांचे स्वातंत्र संग्रामातील उपेक्षित तारे या विषयावर दि. २४ फेब्रुवारी रोजी ६ ते ९ व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जीवनधर शहरकर उपस्थित राहणार आहेत. सावरकर घराण्यातील स्त्रिया -‘त्या तिघी’ या विषयावर नागपूर येथील डॉ. शुभा साठे यांचे व्याख्यान ६ ते ९ या वेळेत दि. २६ फेब्रुवारी रोजी स्नेह वर्धिनी मंडळाच्या अध्यक्षा सौ. जगदेवी लातुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या तिन दिवशीय व्याख्यानमालेचा जास्तीत जास्त लातुरकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन नवनिर्माण प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रविण सरदेशमुख व प्रतिष्ठानच्या कार्यकारी मंडळाने केले आहे.


Comments

Top