HOME   लातूर न्यूज

रेल्वे प्रकल्पाचे ३१ मार्चला भूमीपूजन- पालकमंत्री

रेल्वेमंत्री, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, खासदार, आमदार, पदाधिकार्‍यांची मांदियाळी


रेल्वे प्रकल्पाचे ३१ मार्चला भूमीपूजन- पालकमंत्री

लातूर: हरंगुळ येथे उभारण्यात येणार्‍या मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पाचे भूमीपूजन ३१ मार्च २०१८ रोजी केले जाणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली. रेल्वे प्रकल्प भूमीपूजन कार्यक्रमासंदर्भात लातूर येथे आयोजित बैठकीत पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. या बैठकीस खा. सुनिल गायकवाड, आ. सुधाकर भालेराव, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच भाजपाचे तालूकाध्यक्ष यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, ३१ मार्च रोजी हरंगुळ येथे भूमीपूजन व त्यानंतर सायंकाळी ०४ वाजता लातूर येथील क्रीडा संकुलात जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी उभारल्या जाणार्‍या व्यासपिठाचे पूजन होणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने रोजगार उपलब्ध करुन देणारा मराठवाडयात सुरु होणारा हा पहिलाच प्रकल्प असणार आहे. एसी व मेट्रो कोच निर्माण करणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे असेही पालकमंत्री म्हणाले. या प्रकल्पाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरीक व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा व या माध्यमातून विकासाची गुढी उभारण्याचा मनोदय आहे. रेल्वे प्रकल्पाच्या माध्यमातून लातूर जिल्हयासह संपूर्ण मराठवाडयाच्या विकासाला गती मिळणार आहे.


Comments

Top