HOME   लातूर न्यूज

पालकमंत्र्यांनी महिला तंत्रनिकेतनबाबतचा संभ्रम त्वरीत दूर करावा

शासन-प्रशासनात समन्वयाचा अभाव आहे काय?- आ. अमित देशमुख


पालकमंत्र्यांनी महिला तंत्रनिकेतनबाबतचा संभ्रम त्वरीत दूर करावा

लातूर: लातूर येथील महिला तंत्रनिकेतन कोणत्याही परस्थितीत बंद होणार नाही असे राज्याचे शिक्षणमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ठासून सांगत असताना, प्रशासनाकडून हे तंत्रनिकेतन बंद करण्याची प्रक्रिया सुरू ठेवल्याचे दिसून येत आहे. यावरून शासन आणि प्रशासन यांच्या समन्वय दिसून येत नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील यांनी याविषयात तातडीने लक्ष घालावे, शासन-प्रशासनातला अवमेळ दूर करून महिला तंत्रनिकेतन बंद करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती द्यावी अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी केली आहे.
या संदर्भानं आमदार देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने लातूर येथे नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केल्या नंतर, येथील महिला तंत्रनिकेतन कॉलेज बंद करण्यात येणार अशी चर्चा सुरू झाली होती. लातूरची ओळख असलेले हे तंत्रनिकेतन बंद होऊ नये यासाठी येथील लोकप्रतिनीधी, शिक्षणप्रेमी, नागरीक यांनी शासनाकडे निवेदने पाठवून विनंती केली होती. येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनीही या संदर्भाने दिर्घ आंदोलनही चालवले आहे. या संदर्भातील पाठपुराव्यानंतर लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांना हे तंत्रनिकेतन बंद करून नये अशी विनंती केली होती असे सांगणाऱ्यांकडून या भेटीत लातूरला नवीन अभियांत्रीकी महाविद्यालय मिळाले आणि महिला तंत्रनिकेतन बंद होणार नाही असे आश्वासन शिक्षण मंत््रयांनी आपणाला दिल्याचे लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील यांनी पत्रकारांना सांगितले होते, शिवाय फेसबुकवर लाईव्ह येऊन त्यांनी तशी घोषणाही केली होती. प्रत्यक्षात मात्र ऑल इंडिया कॉन्सिल टेक्नीकल एज्युकेशन (एआयसीटीई) मार्फत जानेवारी २०१८ पासूनच हे महिला तंत्रनिकेतन बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली होती असे निदर्शनास आले आहे. मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही ती प्रक्रीया तशीच पुढे चालू राहिली आणि आता येत्या शैक्षणिक वर्षापासून हे महिला तंत्रनिकेतन को-एज्युकेशनमध्ये रूपांतरीत केल्याचे पत्रच एआयसीटीई कडून प्राप्त झाले आहे. यापुढे हे तंत्रनिकेतन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक बार्शी रोड या नावाने ओळखले जाईल व तेथे मुले व मुलींसाठी प्रवेश दिला जाणार आहे. यात शहरातील दुसरे मुला-मुलींचे तंत्रनिकेतन बंदच होणार आहे. वास्तविक पाहता शिक्षणाचा एक वेगळा पॅटर्न निर्माण केलेल्या लातूरसाठी खासबाब म्हणून महिला तंत्रनिकेतनची मंजुरी मिळालेली होती. जे-जे नव ते लातूरला हवं असा ध्यास घेतलेले लोकनेते विलासराव देशमुख राज्यात मंत्री असताना त्यांनी हे महिला तंत्रनिकेतन सुरू केले होते. तात्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या यवतमाळ जिल्ह्यासाठी एक आणि लातूरसाठी एक असे महिला तंत्रनिकेतन मंजूर करताना विलासराव देशमुख यांनी आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीचा अवलंब केला होता. मागच्या २०-२५ वर्षात या तंत्रनिकेतन मधून हजारो विद्यार्थ्यीनी तंत्रशिक्षण घेऊन तांत्रीकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनल्या आहेत. त्या देशात आणि विदेशात विविध पदावर कार्यरात आहेत. महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम बनविणारे हे तंत्रनिकेतन बेटी बचावचा नारा देणाऱ्या शासनाकडून बंद होणे योग्य वाटत नाही, यातून शासनाच्या कथनी आणि करणीत यात फरक असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. खरे तर राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या आश्वासनानंतर येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यीनी आणि राज्याला शैक्षणीक पॅटर्न देणाऱ्या लातूरकरांना दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा अल्पकाळच टिकला असून प्रशासनाच्या आदेशामुळे सर्वत्र संभ्रम निर्माण झाला आहे.
लातूरच्या पालकमंत्र्यांनी या विषयात तातडीने लक्ष घालून दिलेल्या आश्वासना प्रमाणे कारवाई करावी, महिला तंत्रनिकेतन बंद होणार नाही असा आदेश काढावा व लोकांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करावा असेही आमदार देशमुख यांनी निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे.
पालकमंत्र्यांनी व्यक्तीश: लक्ष घालावे
लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील यांनी लातूरचे महिला तंत्रनिकेतन बंद होऊ नये म्हणून व्यक्तीश: लक्ष घालावे. अशा आशयाचे पत्र माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पाठवले असून सरकारकडून यासंदर्भाने ज्या नवी योजना राबवण्यात येत आहेत. त्याचे आम्ही स्वागत करतो परंतु जुने बंद करून आणि केवळ नाव बदलून त्याच योजना पुन्हा सुरू करणे योग्य ठरत नाही याची काळजी शासनाने घ्यावी असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.


Comments

Top