HOME   लातूर न्यूज

इंद्रप्रस्थ अभियानात कुचराई करणार्‍यांची गय नाही!

सरपंच, ग्रामसेवकांच्या बैठकीत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी दिला इशारा


इंद्रप्रस्थ अभियानात कुचराई करणार्‍यांची गय नाही!

लातूर: लातूर जिल्ह्यात सध्या इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान राबविण्यात येत आहे. दुष्काळी जिल्हा ही लातूरची ओळख पुसून पाणीदार जिल्हा अशी करायची आहे. यासाठी राबविण्यात येत असलेल्या या अभियानात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. या कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. वेळप्रसंगी कारवाई केली जाईल, असा सूचक इशारा पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिला.
इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाच्या पार्श्वभूमीवर थोरमोटे लॉन्स येथे जिल्ह्यातील जिल्ह्यातील जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री बोलत होते. जिल्हाधिकारी जी श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांची उपस्थिती होती. पालकमंत्री पुढे म्हणाले की उद्याचा विचार करून हे अभियान आपण सुरू केले आहे. या माध्यमातून आपल्या मातीचे ऋण फेडण्याची संधी प्रत्येकास प्राप्त झाली आहे. पाण्यासाठी स्वावलंबी होण्याचा ध्यास प्रत्येकाने घेतला तर जिल्हा पाणीदार होणार आहे. २००३ सालीच या अभियानाचा विचार माझ्या डोक्यात आला होता. त्यावेळी स्वतःच्या घरी शोष खड्डा करून जलपुनर्भरण केले होते. त्याचा फायदा आजही होत आहे. परंतु त्याकाळी हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात अडचणी होत्या. आज तो अधिकार प्राप्त झाल्यामुळे आपण जिल्ह्यात अभियान राबवित असल्याचे पालकमंत्री म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेचा जनक म्हणून लातूरची ओळख आहे. दुष्काळाच्या काळात नागरिकांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाणी टंचाई पाहिली. ती दूर करण्यासाठी विविध योजना राबविल्या. यामुळे जलयुक्त शिवारचे सर्वाधिक काम लातूर जिल्ह्यात झाले आहे. इंद्रप्रस्थ जलभुमी अभियानाचे कामही असेच होत असून ते यशस्वी झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात मध्ये त्याचा उल्लेख होईल. शिवाय जागतिक पातळीवर दखल घेतली जाईल. जगातील माध्यमे या अभियानाची दखल घेतील. परंतु अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांची मदत आवश्यक आहे. या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. आवश्यक ते सर्व उपलब्ध करून दिले जाईल. परंतु असे असतानाही कामात हलगर्जीपणा केल्यास कठोर पावले उचलल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अभियानातील पंचनिष्ठांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कामाला लागा अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. ज्या ग्रामपंचायतीने उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले त्या ग्रामपंचायतीचे पाणंद रस्त्याचे सर्व प्रस्ताव तात्काळ मंजूर केले जातील अशी ग्वाही पालकमंत्री निलंगेकर यांनी दिली.


Comments

Top