HOME   लातूर न्यूज

बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांना निरोप

गुंजकर यांचे कार्य लातूर बाजार समितीसाठी दिशादर्शक!


बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांना निरोप

लातूर: लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांची औसा येथे सहाय्यक निबंधक या पदावर बदली झाली. लातूर बाजार समितीच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. मधुकर गुंजकर हे मागील सहा वर्षांपासून लातूर बाजार समितीचे सचिव म्हणून कार्यरत होते. गुंजकर यांच्या कार्यकाळात लातूर बाजार समितीला विविध उपक्रम राबविण्यास मदत झाली. तसेच कर्मचाऱ्यांना शिस्त लागली. याच काळात इ-ऑक्षन राबविण्यात लातूर बाजार समितीने राज्यात पहिला क्रमांक पटकावला. शेतमाल तारण योजना राबविण्यात लातूर बाजार समितीने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. बाजार समितीचे व्यवहार गतिमान आणि पारदर्शक होण्यासाठी गुंजकर यांनी विशेष परिश्रम घेतले. आर्थिक शिस्त लावली. एमआयडीसी परिसरात नवीन बाजार पेठ उभारण्यासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या घेण्यासाठी पाठपुरावा करुन उभारणीची कामे गतिमान करण्यासाठी प्रयत्न केले. मागील सहा वर्षांपासून लातूर येथे कार्यरत असल्यामुळे गुंजकर यांची नियतकालिक बदली होऊन त्यांना औसा येथे सहाय्यक निबंधक या पदावर पाठविण्यात आले. यामुळे लातूर बाजार समितीच्या वतीने त्यांना निरोप देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, उपसभापती मनोज पाटील, ज्येष्ठ संचालक तथा माजी आमदार वैजनाथराव शिंदे, विक्रम शिंदे, संभाजीराव वायाळ, गोविंद नरहारे, ॲड बळवंत जाधव, बाळूसेठ बिदादा, सुधीर गोजमगुंडे, रावसाहेब पाटील, विष्णूअप्पा मोहिते, तात्यासाहेब बेद्रे, तुकाराम आडे, फुलचंद शिंदे, हनुमंत खंदाडे, हर्षवर्धन सवई, यांच्यासह सर्व संचालक व प्रभारी सचिव दिलीप पाटील, सहाय्यक सचिव भास्कर शिंदे, सतिश भोसले व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना सभापती ललितभाई शहा यांनी सचिव मधुकर गुंजकर यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. गुंजकर यांनी लातूर बाजार समितीचा राज्यात नावलौकिक करण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. माजी आमदार तथा संचालक वैजनाथराव शिंदे यांनी गुंजकर यांचे कार्य लातूर बाजार समितीसाठी दिशादर्शक ठरल्याचे सांगितले. गुंजकर यांच्यासारखे अधिकारी असल्यानंतर संस्थेची वेगाने प्रगती होते असा उल्लेख त्यांनी केला. प्रारंभी सभापती ललितभाई शहा यांच्या हस्ते मधुकर गुंजकर यांचा सत्कार करण्यात आला.


Comments

Top