HOME   लातूर न्यूज

आता ‘हरित ग्राम’ला ५५, ५५५ रुपयांचे बक्षीस

वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन


आता ‘हरित ग्राम’ला ५५, ५५५ रुपयांचे बक्षीस

लातूर: लातूर जिल्हा हरित जिल्हा व्हावा यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने झाडे लावा, झाडे जगवा अन् मिळवा रोख 55,555/- बक्षीस हा उपक्रम सुरु करण्यात आला असून, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या बक्षीस योजनेचे उद्घाटन लातूर येथे करण्यात आले. लातूर जिल्ह्रात अत्यंत कमी वनक्षेत्र आहे. हे वनक्षेत्र वाढावे यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने मागील तीन वर्षांत वृक्षारोपण, संगोपन आणि जनजागरण ही चळवळ राबविण्यात येत आहे. या चळवळीअंतर्गत एक विद्यार्थी-एक वृक्ष, ट्री बँक, घर तिथे वृक्ष, वृक्षांचे वाढदिवस, एक गणेश मंडळ-पाच वृक्ष, वृक्षांचे वाढदिवस, वृक्ष संवर्धन बद्दल सत्कार, पर्यावरणपूरक सण-उत्सव आदींसह विविध उपक्रम हाती घेण्यात आले. लातूरचे वनक्षेत्र वाढावे यासाठी यावर्षी वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने लातूर तालुक्यातील जे गाव वृक्ष लागवड आणि संवर्धन करतील अशा गावास 55,555/- रुपये बक्षीस, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे. या बक्षीस योजनेचे उद्घाटन वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते लातूर येथे करण्यात आले. या बक्षीस योजनेचे वनमंत्र्यांनी कौतुक केले असून, यात जास्तीत जास्त गावांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने उमाकांत मुंडलिक यांनी वनमंत्र्यांना वसुंधरा प्रतिष्ठानच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, वृक्ष संवर्धनासाठी बक्षीस देणारी वसुंधरा प्रतिष्ठान ही एकमेव संस्था असून, त्यांचा आदर्श इतरांनी घेतला तर वनांचे क्षेत्र वाढण्यास मोठी मदत होणार आहे. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे शहराध्यक्ष उमाकांत मुंडलिक, सदस्य अमोल स्वामी आदींची उपस्थिती होती.
गावांनी बक्षीस योजनेत सहभागी व्हावे
वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने मिशन - २०२० अंतर्गत वृक्ष संवर्धनासाठी 55,555/- रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले असून, या बक्षीस योजनेत गावांनी सहभागी होण्यासाठी ३० जूनपर्यंत वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा (9850028711) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


Comments

Top