HOME   टॉप स्टोरी

त्रिपुरा महाविद्यालयातील त्या विद्यार्थीनीचा मृत्यू!

प्रशासन आणि त्या मुलीच्या मित्रावर कारवाई करण्याची नातलगांची मागणी


लातूर: दोन दिवसापुर्वी त्रिपुरा महाविद्यालयाच्या छतावरून उडी घेतलेल्या विद्यार्थिनीचं निधन झालं आहे. या आत्महत्येप्रकरणी आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातलगांनी घेतला आहे. लातूर शहराची ओळख ही राज्यभरात शिक्षणाची पंढरी असताना मागील एका महिन्यात लाजिरवाण्या घटना घडल्या आहेत. एका खाजगी शिकवणी संचालकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि दोन दिवसांपुर्वी त्रिपुरा महाविद्यालयातील एका विद्यार्थीनीने कॉलेजच्या तिसर्‍या मजल्यावरुन उडी घेतली. या प्रकरणात तिच्या पालकांनी आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍यांच्या विरोधात कारवाईची मागणी लेखी स्वरूपात केली आहे. परंतू अद्याप पर्यंत या प्रकरणी पोलिसांनी FIR देखील दाखल करून घेतला नसल्याची माहिती येत आहे. या घटनेचे काही CCTV फुटेज वायरल होत असून यामध्ये कॉलेज प्रशासनाकडून त्या मुलीला कुठल्यातरी विषयासंबंधी साधारण ३० ते ४० मिनिटे तिची कानउघाडणी केल्याचं दिसतंय, तसेच या संबंधीची जाणीव उमाकांत होनराव तथा ओंकार होनराव या संस्थाचालक पिता पुत्रांना होती. त्यांच्याच आदेशावरून त्या मुलीबरोबर कानउघडणी करण्यात आल्याचं कळतंय. हा त्रास असह्य झाल्यामुळं या विद्यार्थिनींने महाविद्यालयाच्या टेरेसवरून उडी मारल्याचं कळत आहे. तिचं हे कृत्य CCTV कॅमेर्‍यात कैद झालं आहे. तिला अडवण्यासाठी कॉलेजचे काही कर्मचारी तिच्यामागे धावत असल्याचेही फुटेज मध्ये दिसत आहे. हे महाविद्यालय अनेक कारणांसाठी बदनाम आहे. पण संस्था व संस्थाचालकांना असलेल्या राजकीय वरदहस्तामुळे आजपर्यंत कुठलीही ठोस कारवाई झाली नाही. या प्रकरणीही अशीच चालढकल सुरू असून उलट ‘ती मुलगीच तशी होती’ असा प्रचार करण्यात येत आहे. शैक्षणिक पंढरीत अशी ओळख असणार्‍या या शहरात शैक्षणिक क्षेत्राचं वाढतं गुन्हेगारीकरण हे अतिशय चिंताजनक असून सुजाण लातूरकरांनी वेळीच दक्ष होणं गरजेचं आहे.


Comments

Top