HOME   टॉप स्टोरी

मराठा टायगर्स, व्हीएस पॅंथर्सचा रास्ता रोको

नुकसान भरपाई, पिण्याचे पाणी, रोहयोची कामे, चारा छावण्या, विद्यार्थ्यांची फी माफी


लातूर: मराठा लिबरेशन टायगर संघटना आणि व्हीएस पॅंथर्स या संघटनांनी बोरगाव काळे येथे रास्ता रोको केला. शेतकर्‍यांचे प्रश्न, पिकांची नुकसान भरपाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चारा छावण्या सुरु कराव्यात आणि दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची फी माफी करावी या प्रमुख मागण्यांसाठी लातूरकडे येणारा रस्ता अडवण्यात आला. लातूरचे नगरसेवक सचिन मस्के यांनी या आंदोलनात पुढाकार घेतला होता.
पावसाअभावी सोयाबीन करपले आहे, त्याचे पंचनामे तातडीने करुन हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. सोयाबीन पिकाची गटनिहाय, गावनिहाय आणेवारी जाहीर करावी, ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, शेतकर्‍यांचे कर्ज सरसकट माफ करावे, रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतमजुरांना पाच किलोमीटर अंतरात काम द्यावे अन्यथा बेरोजगार भत्ता द्यावा. जनावरांसाठी चारा छावण्या सुरु कराव्यात, कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी पणन संघाने १९६३ च्या कायद्यामध्ये केलेल्या सुधारणेची अमलबजावणी करावी, योग्य पद्धतीने आणेवारी करावी अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.
यावेळी प्रशांत साखरे, उमेश देशमुख, राम देशमुख, शिवाजी वाघमारे, वैभव क्षिरसागर, व्यंकट साखरे, आकाश शिंदे, अजित देशमुख, कृष्णा तेलंगे, जोतीराम गंभीरे, काशिनाथ सुरनर, बलभीम काळे, विलास काळे, ज्ञानोबा सातपुते, भारत आदमाने यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top