HOME   टॉप स्टोरी

हातगाडे टाकले उलथवून, ना सूचना ना नोटीस!

मनपा कर्मचार्‍यांची कामगिरी! हप्ता घेण्यावरुन वाद झाल्याचा आरोप


लातूर: लातुरचा औसा मार्ग आणि बार्शी मार्गावर महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांची अदभूत कामगिरी पहायला मिळाली. विना परवाना रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे हातगाडे उलथून टाकण्यात आले. औसा मार्गावर क्रीडा संकुलाच्या बाजुने असलेले १० ते १५ हातगाडे या कारवाईत आडवे झाले. अनेक गाड्यातील अन्नपदार्थांचीही नासाडी झाली. औसा मार्गावर फक्त क्रीडा संकुलाच्या बाजुचेच हातगाडे पालथे करण्यात आले. समोरच्या बाजुचे हातगाडे मात्र दिमाखात उभे होते. सकाळी दहाच्या सुमारास मनपाचे चारपाचजण आले. त्यांनी कुणालाही काहीही न सांगता हा कारभार केला. अतिक्रमण हटावची मोहीम म्हणावं तर कुणालाही आधी काहीच सांगण्यात आले नव्हते. दिसेल तो गाडा आडवा करण्यात आला. रस्ताच्या एकाच बाजुच्या हातगाड्यांवर अशी कारवाई का करण्यात आली याचे उत्तर कुणाकडेही नव्हते. असाच प्रकार बार्शी मार्गावरही घडला.
या सगळ्याच रस्त्यांवर उभा असलेल्या हातगाडेचालकांकडून मनपाचे कर्मचारी नित्य नियमाने हप्ता वसूल करतात. हप्ता कोण वसूल करायचा यावरुन मनपा कर्मचार्‍यात वाद झाला या वादातूनच हा प्रकार घडला असा दावा एका हातगाडाचालकाने केला. याबाबत मनपाकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे सगळे हातगाडे चालक मनपात उपायुक्तांना भेटण्यासाठी हजर झाले. त्यांनी उपायुक्त कांबळे यांची भेट घेतली. याबाबत बोलण्यास नकार देत कांबळे यांनी आयुक्तांकडे बोट दाखवले.


Comments

Top