HOME   टॉप स्टोरी

महापौर आणि प्रकाश पाठकांना हाकलायची खेळी!

राजीनामे कुणीच दिले नाहीत, शैलेश गोजमगुंडे यांचा दावा, लाहोटींचा शह देण्याचा प्रयत्न


लातूर: स्वच्छ, चारित्र्यवान आणि प्रभू रामचंद्राचा वारसा सांगणार्‍या लातुरच्या भाजपात अनेक शकुनी मामा तयार झाले आहेत. मनपात तर एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या राजकारणाने कळस गाठला आहे. जेवढे पदाधिकारी तेवढे गट, त्यात शैलेश लाहोटींचा वेगळाच गट. काही स्वतंत्र गट. कॉंग्रेसमध्ये कधी बघितली नाही एवढी गटबाजी भाजपाच्या मनपात दिसते. कुणाचा पायपोस कुणाला नसतो. कुणीही नीट माहिती देत नाही. सगळेजण आपापल्या दुकानदारीत व्यग्र असतात असा दावा कॉंग्रेसचे नेते करतात.
महापौर सुरेश पवार, उपमहापौर देवीदास काळे, स्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे, तीन स्विकृत सदस्य अशा साधारणत: दहा पदाधिकार्‍यांचे राजीनामे पक्षाच्या आदेशानुसार घेण्यात आले अशी माहिती शैलेश लाहोटी देतात. महापौर आपल्या कामात कुचकामी ठरले आहेत आणि स्विकृत सदस्य प्रकाश पाठक डोईजड झाले आहेत. या दोघांना बाजुला करण्यासाठी ही खेळी खेळली जात आहे. आज महापौरांचा राजीनामा आला आहे. एवढ्यावर विरोधकांचं समाधान नाही. महापौरांना अपात्र ठरवले गेले पाहिजे असे स्थायी समितीचे माजी सभापती अशोक गोविंदपूरकर सांगतात.
दरम्यान या सगळ्यांचे राजीनामे आधीच घेण्यात आले आहे. काल फक्त ही बातमी ‘फुटली’ असं काहीजण सांगतात. भाजपाच्या खेळीत शैलेश गोजमगुंडे, देवीदास काळे यांना काहीच होणार नाही यांची पदे, नियुक्त्या तशाच राहतील असाही दावा गोविंदपूरकर करतात. महापौर म्हणून सुरेश पवार यांचे कार्य शून्य आहे. कुठल्याही विषयात महत्वाची कामगिरी बजावली नाही. नवीन निधी आणणे त्यासाठी पाठपुरावा करणे अशा बाबी महापौर करीत नाहीत. आता भाजपाला आपल्याशिवाय पर्याय राहिला नाही असा भ्रम महापौरांचा झाला आहे असेही बोलले जाते.


Comments

Top