HOME   टॉप स्टोरी

बाभळगाव नाक्यावर अपघात एक ठार दोन विद्यार्थी जखमी

भल्या सकाळी घडली घटना, हद्दीवरुन जवळच्या दोन्ही ठाण्यात वाद


लातूर: आज सकाळी पावणेआठच्या दरम्यान बाभळगाव नाका चौकात भरधाव जाणार्‍या कंटेनरला रिक्षाचालकाने क्लिनरच्या बाजुला धडक दिली. यात रिक्षाचालक जागेवरच मरण पावला. त्याच्या रिक्षात दोन विद्यार्थिनी आणि एक विद्यार्थी बसला होता. ही रिक्षा बाभळगावहून येत होती. कंटेनर गरुड चौकातून बसवेश्वर चौकाकडे जात होता. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले. दरम्यान या भागातील रहिवाशांनी हाकेच्या अंतरावर असलेल्या ग्रामीण पोलिसांकडे खबर दिली. त्यांनी हा भाग आमच्या हद्दीत येत नसल्याचे सांगितले. मग विवेकानंद चौक पोलिस ठाण्याशी संपर्क केला. त्यांनीही हा भाग आमच्या हद्दीत येत नसल्याचे सांगू हात वर केले. अखेर या भागातील व्यावसायिक प्रवीण कलमुगळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जखमींना एका रिक्षातून सर्वोपचार-सरकारी रुग्णालयात पाठवून दिले. मरण पावलेल्या रिक्षाचालकाची ओळख पटली नाही. दोन गंभीर जखमी विद्यार्थीही बोलण्याच्या अवस्थेत नव्हते. अपघातग्रस्त रिक्षा ग्रामीण पोलिस ठाण्यात लावण्यात आला आहे. तर कंटेनर विवेकानंद पोलिस चौकीत लावण्यात आला आहे. या चौकात चारही रस्त्यावर गतीरोधक हवे. सिग्नल आणि वाहतूक पोलिस हवा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.


Comments

Top