HOME   टॉप स्टोरी

नशाबाज शिक्षकांनी मुख्याध्यापकांना पाठवले घरी, विद्यार्थी वार्‍यावर

तीन महिन्यांवर दहावीची परिक्षा, गणित कोणी शिकवेना, गुडसूरचे विद्यार्थी जिल्हा परिषदेत


लातूर: शाळेतल्या नशाबाज शिक्षकांमुळे एका शाळेचं भवितव्यच धोक्यात आलंय त्याची ही कथा....तीन महिन्यांवर दहावीची परिक्षा आलेली असताना एका शाळेतला गणिताचा शिक्षकच शाळेत येत नाही, दुसरं कुणी गणित शिकवत नाही, होणार्‍या नुकसानीला कोण जबाबदार? असा सवाल करीत उदगीर तालुक्यातल्या गुडसूरचे आठवी, नववी आणि दहावीचे ३८ विद्यार्थी आणि पालक आज जिल्हा परिषदेत आले. नव्या सीईओंची आणि जिल्हा परिषद अध्यक्षांची भेट घेतली निवेदन दिले. चार पाच दिवसात उपाययोजना केली जाईल असं आश्वासन मिळाल्यावर हे सारेजण गावाकडे परतले.
उदगीर तालुक्यातील गुडसूरच्या जिल्हा परिषद शाळेत दहावीला गणित शिकवणारे विठ्ठल मद्देवाड प्रभारी मुख्याध्यापकपद सांभाळत होते. नशापान आणि धुम्रपान करणार्‍या शिक्षकांना त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. असे प्रकार शाळेत चालणार नाहीत असे बजावले. यामुळे खवळलेल्या शिक्षकांनी स्थानिक नेत्यांच्या मदतीने मद्देवाड यांचे मुख्याध्यापकपद काढून घेतले. त्यांच्या जागी गिरींना नेमले. या प्रकारामुळे व्यथित झालेले मद्देवाड रजा टाकून निघून गेले. आता दहावीचं गणित कोण शिकवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे असं विद्यार्थी सांगतात. या शाळेत शिक्षकांचे अनेक अंतर्गत वाद आहेत. दोन महिला शिक्षकांनी शिक्षकांकडून त्रास होत असल्याची तक्रारही सीईओंना दिली आहे. दोषी शिक्षकांवर कारवाई करावी, विद्यार्थ्यांचे नुकसान थांबवावे, रिक्त असलेले सेवकाचे पद भरावे अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे. यावेळी बालाजी देमगुडे, नागेश नवाडे, पिराजी गोतावळे, रंजना गोतावळे, निर्मला सूर्यवंशी, लक्ष्मण सूर्यवंशी, लक्ष्मी एकुरके, संगुबाई सूर्यवंशी, संतोष सूर्यवंशी, बाबू सूर्यवंशी आदी पालक उपस्थित होते.


Comments

Top