HOME   टॉप स्टोरी

जिल्ह्यातील ३२ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार

पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण


लातूर: जिल्हयात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत कृषी वाहिनी योजनेंतर्गत ०१ ते ०८ मेगावॅट क्षमतेचे २५ सौर उर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आले असून यातून एकूण ९१ मेगा वॅट वीज निर्मिती होणार आहे. हे प्रकल्प निलंगा, औसा, अहमदपूर, चाकूर, रेणापूर व जळकोट व शिरुर अनंतपाळ या तालुक्यात प्रस्तावित असून भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झालेली आहे. या योजनेमुळे जिल्हयातील सुमारे ३२ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पंपाला दिवसा वीज मिळणार असून हे सर्व शेतकरी भारनियमानातून मुक्त होणार असल्याने कृषी पंपाला अखंडितपणे वीज मिळून उत्पादनात वाढ होणार असल्याचे प्रतिपादन कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पूर्नवसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
बाभळगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी खासदार सुनील गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, महापौर सुरेश पवार, माजी खासदार गोपाळराव पाटील, माजी खासदार रुपाताई पाटील, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, पोलिस अधिक्षक राजेंद्र माने, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, अतिरिक्त पोलिस अधिक्षक काकासाहेब डोळे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री निलंगेकर पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान या महत्वकांक्षी योजनेंतर्गत लातूर जिल्हयातील ७९५ गावांमध्ये १३ हजार ३५५ कामे पूर्ण झाली असून यावर्षीची ०२ हजार ७०० कामेही सुरु आहेत. या माध्यमातून जलसंधारणांची विविध कामे करुन गावे पाणीदार केली जात आहेत. जलयुक्तच्या पूर्ण झालेल्या कामांतून एकूण ४८ हजार ८२८ टीसीएम पाणी साठा निर्माण झाल्याने ०१ लाख ०१ हजार ६५६ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आलेले आहे. या माध्यमातून गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याबरोबरच शेतीला संरक्षित पाणी मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे असे त्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात कर्जमाफी, महात्मा फुले जन आरोग्य योजना यातून झालेल्या कामांची माहिती दिली. शेततळी, आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, हागणदारी मुक्ती योजना, दिव्यांग पुरस्कार घरकुल योजना, प्राथमिक आरोग्य केंद्रात सौर ऊर्जा यंत्रणा आदी विविध योजनांची माहिती दिली.


Comments

Top