HOME   टॉप स्टोरी

कचरा डेपोमुळे ऊस जळाला! कचरा जमवणे बंद

मनपा संकटात, कर्मचारी घरी, कचरा रस्त्यावर


लातूर: वरवंटी येथील मनपाच्या कचरा डेपोला आग लागल्याने ती आग आपल्या ऊसापर्यंत पोचली आणि ऊस जळाला असे सांगत एका शेतकर्‍याने डेपोवर येणारा कचरा थांबवला आहे. या ठिकाणी कचरा जमवणे बंद आहे. कचरा डेपोबद्दल सातत्याने काही ना काही वाद असतोच. या भागातलं पाणी दूषित होणे, पिसाळलेल्या कुत्र्यांचा संचार वाढणे, डेपोवरील प्लास्टीक वार्‍याने शेतात पसरणे, पिसाळलेल्या कुत्र्यांकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले होणे हे प्रकार सतत ऐकायला येत असतात. अशातच ऊसाचं हे संकट आलंय. वरवंटी येथील कचरा डेपोजवळ अमोल पवार यांचे शेत आहे. शेतात ऊस आहे. या ऊसाला आग लागली असे त्यांचे म्हणणे आहे. परिणामी डेपोवर येणारा कचरा त्यांनी थांबवला आहे.
पाच सहा दिवसांपासून डेपोच्या एका बाजुला आग लागली होती. ती विझवावी अशी विनंती मनपा प्रशासनाला केली पण उपयोग होत नाही. त्याच जळत्या कचर्‍यावर नवा कचरा टाकला जातो यामुळे आग वाढत जाते. ती आपल्या ऊसापर्यंत येऊन पोचली. आपला पाच एकर ऊस त्यात जळाला. त्याची नुकसान भरपाई द्यावी अन्यथा या डेपोपर्यंत येऊ दिला जाणार नाही असा इशारा अमोल पवार यांनी दिला आहे.


Comments

Top