logo

HOME   टॉप स्टोरी

मराठवाड्याचं वाळवंट होऊ देणार नाही-नितीन गडकरी

लातुरमध्ये राष्ट्रीय महामार्गाचं जाळं तयार केलं

लातूर: लोकसभेची ही निवडणूक देशाच्या भविष्याचा फैसला करणारी आहे. पाण्याचा प्रश्‍न सोडवायचा असेल, गोरगरीब जनतेचे कल्याण करून देशाला आर्थिक महासत्ता बनवायचे असेल तर भाजपाला विजयी करा असे सांगतानाच लातूरचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी लातूर मतदारसंघातील मतदारांनी भाजपाला विजयी करावे. लातूरला पाणी पोहोचविण्याची जबाबदारी मी घेतो अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नदीजोड प्रकल्प राबवून मराठवाड्याचा कॅलिफोर्निया केल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.
लातूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारासाठी आयोजित विराट सभेत नितीन गडकरी बोलत होते. या सरकारने सिंचन प्रकल्पांसाठी अ‍ॅडव्हान्स पैसे देवून कामे सुरू केली. परंतु ती कामे पूर्ण झाली नाहीत. मी मंत्री झाल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने अर्धवट ठेवलेल्या सिंचनाच्या स्मारकांना चाळीस हजार कोटी रूपयांचा निधी दिला. एका अर्थाने ही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आत्म्याला श्रध्दांजलीच असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाने अर्धवट प्रकल्पांसाठी निधी देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे ते म्हणाले. लातुरात जलसंवर्धनाचे काम अतिशय चांगले झाले आहे. मराठवाड्यात पाण्याचा प्रश्‍न कायम आहे. तो सोडविण्यासाठी पाणी जमिनीत मुरवणे गरजेचे आहे. नदीजोड प्रकल्प हा देखील त्यासाठी पर्याय असून राज्यात असे दोन प्रकल्प मी हाती घेतले आहेत. दमणगंगा प्रकल्प सुरू करून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीमध्ये आणण्याची योजना आहे. या माध्यमातून मराठवाडा सुजलाम सुफलाम होईल. दुसरा प्रकल्प तापी व नर्मदा या नद्यांवर राबविला जाणार आहे. देशात व राज्यात पाण्याची कमतरता नाही फक्त नियोजनाची कमी आहे. यासाठी शेततळी घ्या, नदी, नाल्यांचे खोलीकरण करा व पाणीसाठा वाढवा असेही ते म्हणाले.


Comments

Top