HOME   टॉप स्टोरी

प्रा. ओमप्रकाश मदनसुरे यांचे निधन, लॉजमध्ये सापडला मृतदेह

सामाजिक कार्यात योगदान, अनेक सामाजिक कार्यकर्ते घडवले, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक


लातूर: येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाचे संस्कृत विभागाचे प्रमुख, निवृत्त प्राध्यापक ओमप्रकाश मदनसुरे यांचे निधन झाले. चैनसुख मार्गावरील प्रीतम लॉजच्या २०६ क्रमांकाच्या खोलीत त्यांचा मृतदेह आढळून आला. ही बातमी समजताच अनेक सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, प्राध्यापक जमले. शव विच्छेदन करुन त्यांच्या मृतदेह घरी पाठवण्यात आला. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्यार्थ्यांतील सामाजिक जाणिवा, जिद्द आणि सुप्त गुण ओळखण्यात त्यांचा हातखंडा होता.
शाहू महाविद्यालयात त्यांनी जवळपास ३० वर्ष काम केले. शाहू महाविद्यालयात संस्कृत विभाग सुरु करण्यात त्यांचे योगदान होते. संस्कृतबद्दलचे गैरसमज दूर करुन या विद्याशाखेकडे विद्यार्थ्यांना वळवण्यात त्यांना मोठे यश आले होते. त्यांचे सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान होते. संत गाडगेबाबा अभियान, स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मूल्न, हागणदारी मुक्ती आदी अनेक उपक्रमात त्यांनी भाग तर घेतलाच शिवाय अनेकांना त्यांनी सहभागी करुन घेतलं. संत गाडगेबाबांचा वेश परिधान करुन ते ग्रामीण भागात प्रबोधन करीत असत. योगायोगाने गाडगेबाबांची पुण्यतिथीही आजच आहे. मराठी भाषेवर त्यांचं प्रभुत्व होते. राजर्षी शाहू महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता अशी माहिती प्रा. राजेंद्र शास्त्री यांनी दिली.
प्रा. मदनसुरे यांचं काम विशिष्ट एका विभागापुरतं मर्यादित नव्हतं विविध सामाजिक क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्व पटवून त्यांनी त्यांच्याही हाती खराटा दिला. आपलं वय विसरुन ते विद्यार्थ्यात मिसळत असत असे विद्यार्थ्यांच्या वतीने सुरेश जाधव यांनी सांगितले.


Comments

Top