HOME   टॉप स्टोरी

लातूर बंद शांततेत, बरीच दुकाने आधीच बंद, मोठा बंदोबस्त

शाळा सोडून दिल्या, कार्यकर्तेही शांततेच्या मूडमध्ये, संवेदनशील भागांवर अधिक लक्ष


लातूर: भिमा-कोरेगावच्या दंगलीच्या निषेधार्थ काल लातुरात आंबेडकर अनुयायांनी रोष प्रकट केला. पण आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लातुरात कुठेही गालबोट लागू दिले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने दिलेल्या आंदोलनाच्या अधिकाराचा अर्थ सार्थ करीत क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त शांततेत मोर्चा काढून खरे अभिवादन केले. काल प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या हाकेला सगळ्या दलित संघटनांनी आज प्रतिसाद दिला. आज सकाळी सगळ्या संघटनांचे कार्यकर्ते आंबेडकर चौकात जमले. या ठिकाणी पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं. कार्यकर्त्यांनीही हीच भूमिका असल्याचे सांगितले. आंबेडकर चौक ते गरुड चौक अशी ‘बंद रॅली’ काढण्यात आली. तिथून हे कार्यकर्ते पुन्हा आंबेडकर चौकात आले. तिथून पुढे पाच नंबर चौकापर्यंत बंदचे आवाहन केले आणि माघारी फिरले. ही सगळी मंडळी टाऊन हॉल-आंबेडकर पार्कच्या मैदानावर जमली. छोटीशी सभाही झाली. या ठिकाणी शांततेत बंद पाळल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले, आभार मानण्यात आले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या, अनुचित प्रकार घडले पण लातुरकरांनी शांततेची परंपरा अबाधित ठेवली. या निमित्ताने लातूर शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संवेदनशील भागांवर पोलिसांनी अधिक लक्ष दिले होते.


Comments

Top