HOME   टॉप स्टोरी

मांजरा परिवार किती कारखाने चालवणार?- आ. दिलीपराव देशमुख

पालकमंत्री अन सरकारने मनावर घ्यावे, दोन कारखाने सुरु झाले तर गाळपाचा प्रश्न मिटेल


लातूर: यंदा ऊस भरपूर आहे. पुढच्या वर्षी आणखी वाढणार आहे. एवढा सगळा ऊस कुठे गाळायचा असा प्रश्न निर्माण होणार आहे. लातूर जिल्ह्यातील बंद असलेले दोन कारखाने जरी सुरु झाले तर अतिरिक्त ऊसाच्या गाळपाचा प्रश्न मार्गी लागेल असे आ. दिलीपराव देशमुख यांनी सांगितले. मांजरा परिवारात पाच कारखाने आहेत, ती मोठी जबाबदारी आहे. अशा स्थितीत आणखी कारखाने चालवायला घेणे शक्य नाही असे त्यांनी आजलातूरशी बोलताना सांगितले.
काही दिवसांपूर्वी नळेगावच्या जय जवान जय किसान साखर कारखाना मांजरा परिवाराने चालवायला घ्यावा अशी विनंती त्या भागातील शेतकर्‍यांनी आ. दिलीपराव देशमुख यांच्याकडे केली होती. याची बातमी अनेक वर्तमानपत्रातून आली. त्याचा परिणाम म्हणून की काय औसा तालुक्यातील संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखाना परिसरतीलही शेतकरी काल आ. दिलीपराव देशमुख यांना भेटले, निवेदन दिले. हाही कारखाना चालवायला घ्यावा अशी विनंती करण्यात आली. या निमित्ताने आम्ही आ. दिलीपराव देशमुख यांची भेट घेतली. ऊसाचे पीक वाढल्यामुळे अनेक शेतकर्‍यांची अडचण होणार आहे, कारखाने बंद असल्याने ऊस कुठे घालायचा हा प्रश्न निर्माण होणार आहे. बंद कारखान्याच्या भागातील शेतकर्‍यांनी सरकारकडे जावे, हे कारखाने सुरु करण्याची विनंती करावी, ही जबाबदारी पालकमंत्री आणि सरकारची आहे. मांजरा परिवाराकडे आधीच अनेक कारखाने असल्याने आणखी कारखाने चालवायला घ्यावेत असे वाटत नाही. सरकरकडूनही सहकार्य मिळण्याची खात्री नाही. पालकमंत्री आणि सरकारने मनावर घेतल्यास त्या त्या भागातील चांगले लोक पुढे येतील, हे कारखाने सुरु व्हायला अडचण येणार नाही. ऊसाची लागवड वाढत आहे. पुढच्या वर्षी गळीताचा प्रश्न निर्माण होणार आहे. बंद असलेल्यांपैकी दोन कारखाने सुरु झाले तरी ऊसाच्या गाळपाचा प्रश्न मार्गी लागेल, शेतकर्‍यांनाही मदत होईल. सगळा ऊस गाळला जाईल असेही आ. दिलीपराव देशमुख यांनी सांगितले.


Comments

Top