HOME   टॉप स्टोरी

काम कॉंग्रेसचे पण सुशोभिकरणावर दावा भाजपचा!

श्रेयवादाची लढाई सुरु, सोशल मिडियावर पालकमंत्र्यांसोबत शैलेश लाहोटींनी टाकली फोटोसह पोस्ट!


लातूर: अलीकडच्या सात महिन्यांच्या काळात लातूर शहराचा बकालपणा आवाढतच चाललाय. दोन्हीकडे भाजपाची सरकारे असल्याने किमान महानगरपालिकेला तरी चांगले दिवस येतील अशी अपेक्षा होती पण पहिलेच दिवस चांगले होते म्हणण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत कॉंग्रेसला महत्वाचे स्थायी समितीचे सभापतीपद मिळाले. गोविंदपुरकरांनी जितकं चांगलं करता येईल तितकं चांगलं करण्याचा प्रयत्न चालवला आहे. काही महिन्यांपूर्वी आ. अमित देशमुख यांच्या पुढाकारातून ‘हरित लातूर सुंदर लातूर’ उपक्रम राबवणं सुरु झालं. सेवाभावी संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने, सामाजिक संस्था यांना सहभागी करुन घेतले. शहरातले रस्ते, चौक, सार्वजनिक वापराच्या जागा, हरित पट्टे, रस्ते दुभाजक सुशोभित करणं सुरु झालं. या उपक्रमाशी महानगरपालिकेचा कसलाच संबंध नाही असा खुलासा सत्ताधारी भाजपाकडून करण्यात आला आणि आता श्रेयाची लढाई सुरु झाली आहे!
जाहिरात करा आणि तेवढ्या भागाचे सुशोभिकरण करा या तत्वावर काम सुरु झाले. ही कल्पना राबवण्यासाठी स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी प्रयत्न केले आणि त्याला यशही आलं. पहिल्यांदा गांधी चौक सुशोभित करण्यात आला. नंतर शिवाजी चौक ते पाच नंबर चौक असे काम सुरु झाले. शिवाजी चौकापासून एक किलोमीटर अंतरापर्यंत सनरिचने दुभाजकात झाडे लावण्याची आणि सांभाळण्याची जबाबदारी घेतली. त्यानुसार पाम वृक्षाची आठ ते दहा फूट उंचीची रोपे लावण्यात आली......आणि काल भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी सोशल मिडियावर पालकमंत्र्यांसाह स्वत:चा फोटो टाकून शिवाजी चौकाच्या सुशोभिकरणाचा दावा केला. मनपाची सगळी सत्ता भाजपाकडे असताना कुठंच काही चांगलं पहायला मिळत नाही. पण विरोधकांनी चांगले प्रयत्न सुरु करताच त्यात खोडा घालण्याचे प्रयत्न सुरु झाले. चांगले झाले तर भाजपाने केले, वाईट झाले तर कॉंग्रेसने केले असे सांगितले जाऊ लागले, शहर जरा बरे दिसू लागले की न केलेल्या गोष्टीचे श्रेय घेण्याची धडपड भाजपाकडून सुरु झाली. लोकसहभागातून शहराचं सुशोभिकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहराचा कुठलाही भाग, दुभाजक, चौक सुशोभिकरणासाठी घ्यायची इच्छा असेल तर माझ्याशी किंवा आयुक्तांशी संपर्क साधावा कुणाही मध्यस्थाच्या नादी लागू नये असे आवाहन अशोक गोविंदपूरकर यांनी केले आहे. यावेळी लातूर शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोईजभाई शेख, युक कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष महेश काळे, बिभीषण सांगवीकर उपस्थित होते.


Comments

Top