HOME   टॉप स्टोरी

लातुरच्या चौका-चौकातली सिग्नल यंत्रणा, बनू लागला चेष्टेचा विषय

कधी कुठला सिग्नल बंद पडेल याचा नेम नाही, देखभाल दुरुस्तीचा पत्ता नाही!


लातूर: छोटं शहर, छोटे रस्ते, अफाट लोकसंख्या अन बेसुमार वाहने. त्यातच चौकांचीही संख्या मोठी. अशा विचित्र कोंडीत अडकलेल्या या शहरातली वाहतूक-रहदारी व्यवस्थाही घसरत चालली आहे. शहरातल्या सगळ्या प्रमुख चौकात सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली. तिथेही कॉंग्रेस की भाजप हा श्रेयवाद आडवा आलाच. पण व्यवस्था सुधारली नाही. नव्याने उभारण्यात आलेली सिग्नल यंत्रणा बराच काळ सुरु झाली नाही. आता दयानंद गेट आणि हनुमान चौकातली व्यव्स्था उत्तम आहे. शिवाजी चौकातली सिग्नल यंत्रणा चालवणे कठीण आहे. अशोक हॉटेल चौकातल्या एका खांबावरच्या सिग्नलचे दिवे गेले आहेत. समोरचे थांबले की लोक अंदाजाने उजवीकडे वळतात. मिनी मार्केटची यंत्रणा दुरुस्तीवाचून बराच काळ बंद होती. पुढे गांधी चौकातली यंत्रणा अधून मधून चालू होत असते. या चौकात सिग्नल चालू असले तरी लोक जात येत असतात. बंद असताना तर ‘सगळ्यांच्याच मन का राज’ सुरु असतो. जवळच गांधी चौक ठाण्याच्या वाहतूक यंत्रणेचे कार्यालय असले तरी गांधी चौकातल्या रहदारीवर लक्ष ठेवायला हवालदार नसतो. पुढे हनुमान चौकातली यंत्रणा आणि तिथला कर्तव्यदक्ष गुंडिले नामक हवालदाराचे काम उत्तम आहे. त्यापुढे सुभाष चौकाला मात्र कुणाची तरी नजर लागली असावी. इथली यंत्रणा केव्हाही चालू असते अन केव्हाही बंद पडते. त्याची सवय आता लोकांना होऊ लागलीय. गुळ मार्केट चौक आश्चर्यकारक पद्धतीने दुरुस्त झाला. इथली यंत्रणा तुर्तास तरी चांगली आहे. नव्याने सुरु झालेल्या सिग्नल यंत्रणेजवळ कुठेही झेब्रा क्रॉसिंग किंवा इतर मार्गदर्शक चिन्हे नाहीत. पिवळे पट्टे केव्हाच शहीद झाले आहेत. मनपाचे अधिकारी याचं उत्तर नीटपणे देऊ शकत नाहीत. पदाधिकारी गुत्तेदाराला का ‘घाबरतात’ हे कळत नाही. लातुरची ही सिग्नल यंत्रणा आता चेष्टेचा विषय बनू लागली आहे!


Comments

Top