HOME   टॉप स्टोरी

लातूर-बेंगलोर माझ्यामुळेच, लवकरच लातूर-अजमेर- खा. गायकवाड

लातुरच्या पत्रकारांचेही योगदान मोठे, रेल्वेप्रश्नी केल्या अनेक मागण्या, बहुतांश मान्य!


लातूर: येत्या ०४ फेब्रुवारीपासून लातूर-यशवंतपूर-बेंगलोर सुरु होत आहे अशा आशयाचे पत्रक भाजपाने प्रसिध्दीला दिले. पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याचे हे यश आहे असे यात सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आज खा. सुनील गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली. रेल्वेच्या बैठकीत मांडलेले प्रश्न आणि त्यावर मिळालेल्या आश्वासनांची माहिती दिली. रेल्वे हा केंद्राचा विषय आहे, राज्याचा नाही, संबंधित जिल्ह्याचा खासदारच केंद्राशी संबंधित असतो. लातूर-यशवंतपूर माझ्याच प्रयत्नातून सुरु होत आहे. शिवाय लातुरच्या पत्रकारांनी रेल्वेप्रश्नी दाखवलेल्या सजगतेमुळे सर्वांच्या प्रयत्नामुळे हे सामुहिक यश मिळाले असे सुनील गायकवाड म्हणाले.
लातुरकरांचा ओढा बेंगलोरऐवजी मुंबईकडे अधिक आहे. लातूरहून आणखी एक नवी गाडी मुंबईसाठी सुरु करावी यासाठी प्रयत्नशील आहे. पालकमंत्र्यांनी बेंगलोर गाडीसाठी प्रयत्न करतात, पण मुंबई गाडीसाठी का करीत नाहीत? असा प्रश्न विचारला असता याचं उत्तर पालकमंत्रीच असं खासदार म्हणाले. तुम्ही दोघे एकाच जिल्ह्यातील आहात, एकाच पक्षाचे आहात यावर खसदारांनी एका बैठकीचा हवाला दिला. नितीन गडकरी, रेल्वेमंत्री पियुष गोएल यांच्या उपस्थितीत झालेला सकारात्मक चर्चा सांगितली. मुख्यमंत्र्यांसोबतही बैठक झाली. यावेळी सुरेश प्रभूही उपस्थित होते. तेव्हाही लातूर रेल्वेचा प्रश्न सोडवण्यावर चर्चा झाली. रेल्वेप्रश्नी आपण थेट पंतप्रधानांना भेटून निवेदन दिले आहे. लातूर-यशवंतपूर गाडीची मागणी मी स्वत: केली होती. मुंबई गाडीला दोन डबे जोडले जाणार आहेत. काल भाजपने काढलेलं पत्र अज्ञानातून निघालं असेल. लोकप्रतिनिधी म्हणून मी माझं काम करतो आहे, मी कुणावर उपकार केले नाहीत असेही ते म्हणाले. लातूर-मुंबई रेल्वेगाडीची अपेक्षा लातुरकरांनी विसरुन जावी का? असे विचारले असता खासदार काही क्षण नि:शब्द झाले. या गाडीसाठी मी प्रयत्नशील आहे. लातूर-मुंबई नियमित असावी अशी मागणी मी पंतप्रधान, रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. यातून काहीतरी नक्कीच मार्ग निघेल असे खासदारांनी सांगितले.


Comments

Top