HOME   टॉप स्टोरी

हायकोर्टातून झाल्या मुख्याध्यापिका, मिळवले विद्यार्थ्यांचे १२ लाख!

देशीकेंद्र शाळेच्या जिद्दी मुख्याध्यापिकेचे प्रेरक कहाणी, जिल्हाधिकार्‍यांचे आभार


लातूर: लातुरच्या शिक्षण संस्थात काय चालतं? काय चालत नाही हे विचारा. संस्थाचालक मामा, पुतण्या, भाचा, पुतणी, भाची, जावई, सून यांना आपल्या शाळात रोजी रोटी तर देतातच पण एखाद्या महत्वाच्या पदाला नावडता उमेदवार पात्र ठरला की त्याची गळचेपी सुरु होते. जवळपास सगळ्याच संस्थात एक, दोन, तीन गट असतात. हे गट एकमेकांवर कुरघोडी करीत असतात. असो. अशीच एक कथा आहे देशीकेंद्र शाळेची. मिना आग्रहारकर मागच्या ३२ वर्षांपासून अध्यापनाचे काम करतात. सेवा ज्येष्ठतेनुसार त्या उप मुख्याध्यापक पदाला पात्र ठरल्या पण संचालकातील भांडणांमुळं त्यांना ते पद मिळालं नाही. संस्थेनं त्यांच्या पदाचा प्रस्तावच शिक्षणाधिकार्‍याकडे जाऊ दिला नाही. उप मुख्याध्यापक पदाचा प्रस्ताव संस्थेनं द्यायचा असतो पण संस्था तयार नव्हती. नाईलाजाने आग्रहारकर उच्च न्यायालयात गेल्या आणि उच्च न्यायालयाने न्याय दिला. मागच्या वर्षी मुख्याध्यापक पद मिळालं. कहाणी इथेच संपत नाही. पुढचा प्रवास याहीपेक्षा खडतर होता. या शाळेचं खातं सिद्धेश्वर बॅंकेत आहे. संचालकांनी मुख्याध्यापकांना या खात्यावर व्यवहारच करु दिले नाहीत. बॅंकेला सांगून मुख्याध्यापकांना जेरीस आणलं. विद्यार्थ्यांची फी याच खात्यावर जमा व्हायची. त्यातून शाळेचा दैनंदिन खर्च भागायचा पण बॅंक खात्यावर व्यवहार करु द्यायला तयार नव्हती. सिद्धेश्व्स्र बॅंकेसोबत सहा सात वेळा पत्रव्यवहार केला पण उपयोग झाला नाही. खाते चालवण्यासाठी शालेय समितीचा ठराव आणा असं सांगण्यात आलं. पण कार्यकारिणीच आस्तित्वात नसल्याने ठरावही मिळत नव्हता. कसेतरी पाच महिने काढले. एक परिक्षा कशी तरी भागवली. जिल्हा उप निबंधकांनाही भेटल्या. त्याचाही उपयोग झाला नाही. अखेर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना निवेदन दिलं. जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने सुनावणी घेतली. बॅंक आणि संस्थेच्या जबाबदार व्यक्तींना सुनावणीस हजर केलं आणि मुख्याध्यापिका आग्रहारकर यांना न्याय मिळाला. दोन तासात शाळेचे खाते रिलीज करा अस आदेश त्यांनी दिला. त्यानुसार कार्यवाही झाली. दोन तासात खाते खुले झाले. त्यातून आग्रहारकर यांनी दहा हजार रुपये काढलेही.
देशीकेंद्र ही जिल्ह्यातील नामांकित शाळा आहे. अशा शाळात असे कारभार चालतात. आग्रहारकर पक्क्या होत्या, जिद्दी होत्या, सत्याने चालणार्‍या होत्या म्हणूनच या शाळेतील साडेचार हजार विद्यार्थ्यांनाही न्याय मिळाला!


Comments

Top