HOME   टॉप स्टोरी

आयडियाचे खोदकाम, गुन्हा दाखल, महापौर घालतात पाठीशी

नगरसेवक काथवटेंचा आरोप, हा कसला पारदर्शक कारभार? १२ लाख ६९ हजारांचे नुकसान


लातूर : राजीव गांधी चौक ते बसवेश्वर चौक या दरम्यान आयडीया मोबाईल कंपनीने मनपाची परवानगी न घेता सुमारे अडीच मीटर रस्ता खोदला. केबल अंथरली. हा प्रकार नगरसेवक गौरव काथवटे यांनी उघडकीस आणला असून आयडिया कंपनीला प्रशासन पाठीशी घालत आहे. तर प्रशासनाला महापौर पाठीशी घालत आहेत असा आरोप त्यांनी आजलातूरशी बोलताना केला. दरम्यान महानगरपालिकेच्या तक्रारीवरुन विवेकानंद पोलिस ठाण्यात कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालणारा हा कसला पारदर्शक कारभार? असा सवाल नगरसेवक काथवटे यांनी उपस्थित केला आहे. आयडियाच्या कर्मचार्‍यांनी रात्रीतून ख्रस्त्याच्या बाजुने खड्डा खोदला. त्यात केबल अंथरले आणि खड्डा बुजवून टाकण्यात आला. मुळात रस्ता खोदण्यापूर्वी कंपनीने महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक होते. परंतू त्यांनी कसलीही परवानगी घेतली नाही. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नगरसेवक गौरव काथवटे यांनी २१ नोव्हेंबर रोजी पालिका आयुक्तांना पत्र देऊन संबंधित कंपनीने खोदकाम करण्यासाठी परवानगी घेतली होती का? याची माहिती मागितली. त्यावेळी परवानगी घेतली नसल्याचे सांगण्यात आले. काथवटे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार शाखा अभियंता युडी स्वामी यांनी रोड कारकून यांना पंचनामा करण्यास सांगितले. या पंचनाम्यात किर्ती लँड ते सुयोग कॉलनी या अंतरात खोदकाम करुन केबल अंथरल्याचे उघडकीस आले. कांबळे यांच्या अहवालानंतर स्वामी यांनीही शहर अभियंत्यांना तसा अहवाल सादर केला. या प्रकारानंतर महापालिकेचे १२ लाख ६९ हजार रुपये नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. ही भरपाई संबंधित कंपनीकडून वसूल करावी अशी मागणी गौरव काथवटे यांनी लावून धरली. शिवाय विना परवाना काम केल्याबद्दल कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानुसार महापालिकेने २६ डिसेंबर रोजी विवेकांनद चौक पोलिस ठाणे व शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. तरीही त्यावर कारवाई झाली नाही. दरम्यानच्या काळात ०४ जानेवारी रोजी पालिका आयुक्तांनी कंपनीच्या व्यवस्थापकांशी पत्रव्यवहार करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. परंतू तरीही कंपनीने भरपाई दिली नाही. यामुळे पुन्हा एकदा १७ जानेवारी रोजी पालिकेच्या वतीने विवेकांनद पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.


Comments

Top