HOME   टॉप स्टोरी

लातूर महानगरपालिकेत दरोडा, चोरट्यांनी नेली तिजोरी

पैसे नसलेल्या मनपात चोरी होतेच कशी? चोरट्यांनी वाढवली मनपाची प्रतिष्ठा!


लातूर: २० जानेवारीच्या रात्री किंवा २१ जानेवारीच्या पहाटे लातुरात ऐतिहासिक घटना घडली. ज्या महानग्रपालिकेत चार महिन्यांपासून कर्मचार्‍यांचा पगार झाला नाही अशा मनपात चोरट्य़ांनी चक्क तिजोरीवर डल्ला मारला. लातूर महानगरपालिकेच्या लेखा विभागात दोन तिजोर्‍या आहेत. एक आहे अंदाजे साडेतिनशे किलो वजनाची. १९६२ सालची. जी सहजासहजी हलवता येत नाही. दुसरी होती लाईट वेट. चोरांनी दक्षिणेकडून मनपात प्रवेश केला. लेखा विभागात जाऊन तिजोरी उचलली. त्या आधी न हलणार्‍या तिजोरीला छिद्रही पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश आले नाही. आज सकाळी काही कर्मचारी मनपात आले. त्यात नगरसचिवही होते. या कर्मचार्‍यांच्या लक्षात ही बाब लक्षात येताच धावपळ सुरु झाली. पोलिसांना खबर देण्यात आली. मनपाच्या कारभार्‍यांना कळवण्यात आले. मग ठसे तज्ञ आले. रितसर कारवाई सुरु झाली. काही वेळाने श्वान पथकही आले. या पथकातील श्वान मनपाच्या प्रांगणात रेंगाळले, जिल्हा बॅंकेकडील गेटपर्यंत गेले आणि परत आले. तोपर्यंत मुख्य लेखापाल माधव भिसे, रोखपाल खदीर आणि मनपाच्या कर्मचार्‍यांनी शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले. रितसर तक्रारही दिली.
काय होते तिजोरीत?
ही तिजोरी नेऊन चोरट्यांना पश्चाताप करावा लागला असेल. कारण या तिजोरीत एक रुपया आणि मनपाचे पॅनकार्ड या व्यतिरिक्त काहीच नव्हते. कागदपत्रे ठेवण्यासाठी तिचा वापर केला जायचा असे लेखापाल भिसे यांनी सांगितले. उलट ही तिजोरी सुरक्षित जागी नेण्यासाठी चोरट्यांना किमान हजार दोन हजाराचा खर्च आला असेल हे नक्की. मनपाच्या तिजोरीत खरेच खडखडाट आहे हे पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन सिद्ध होते. शिवाय चोरट्यांनी लातूर मनपात चोरी करुन मनपाची प्रतिष्ठा वाढवली असे अनेकजण खाजगीत बोलतात. उद्या हे चोरटे तिजोरी घेऊन परत येतील, चुकलो म्हणतील आणि मनपाला हजार दोन हजार रुपयांची देणगीही देऊन जातील असेही बोलले जात आहे!


Comments

Top