HOME   टॉप स्टोरी

लातुरचा शेतकरी राष्ट्रीय बाजारात! २१ हजार जणांनी विकले ऑनलाईन सोयाबीन

पारंपारिक सौदा बंद, इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजारात शेतमालाची मोबाईलवर बोली


लातूर: लातूर जिल्ह्यातला शेतकरी आता राष्ट्रीय प्रवाहात आला आहे. केंद्र सरकारने केवळ महाराष्ट्रासाठी सुरु केलेल्या ‘इनाम’ योजनेतून शेतकर्‍यांना आपला शेतीमाल आता कुठेही विकता येणार आहे. यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘इनाम’ पोर्टलद्वारे बोली लावली जाणार असल्याने अधिकाधिक भावही मिळू शकतो. त्याचा प्रत्यय आज आला. आज सोयाबीन्ला यंदाचा सर्वाधिक ३६१५ रुपये एवढा भाव आला. या पद्धतीबाबत शंका असल्याने व्यापार्‍यांनी काल सोयाबीनचा व्यवहारच केला नाही. काल बाजार समितीचे अधिकारी, पदाधिकार्‍यांसोबत बैठक झाली. या बैठकीत सगळ्या शंकांचे निरसन झाल्यानंतर आज सोयाबीनचा इ सौदा झाला.
या नव्या पद्धतीच्या व्यवहारासाठी पहिल्या टप्प्यात राज्यातील ३० बाजार समित्यांची निवड करण्यात आली आहे. शेतकरी शेतमाल घेऊन येतो तेव्हा त्याची गेटवरच नोंद घेतली जाते. वाहन क्रमांक, गाव, नाव, शेतीमालाचे वजन, संबंधित शेतकर्‍याचा मोबाईल नंबर, बॅंक खाते नंबर आदी तपशील घेतला जातो.गेटवरच लॉट पाडले जातात. हे लॉट ऑनलाईन सौद्यासाठी सोडले जातात. इनाम पोर्टलवर आडते आणि खरेदीदारांची नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणीकृत मंडळीच या सौद्यात भाग घेतात. बोली लावली जाते. बोलीची वेळ संपल्यावर ज्याने सर्वाधिक भाव लावला त्याला तो शेतीमाल दिला जातो. तुर्तास ही सुविधा सोयाबीन पुरती मर्यादित आहे. पुढे यात हरभर्‍याचाही समावेश केला जाणार आहे. या पद्धतीमुळे शेतकर्‍यांना चांगला भाव मिळतो. शेतकर्‍याच्या खात्यावर पैसे वर्ग होतात, याच पद्धतीने बाजार समितीचे शुल्क आणि आडत्याचे दोन टक्के कमिशनही लगेचच जमा होतात. या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांनी दिली.
या नव्या पद्धतीबाबत अनेकांकडे अपुरी माहिती होती, अज्ञान होतं. आमच्याही अडचणी होत्या. माल कुणाला सुटला हे लगेचच कळत नव्हतं. पैसेही उशिरा मिळत होते. पण याबाबत बाजार समितीने आमच्या शंकाचे निरसन केले. पैसे उशिरा देणार्‍यांना पुन्हा सौद्यात सहभागी होऊ दिले जात नाही. हा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे शेतकर्‍यांचा फायदा होत आहे असे आडत व्यापारी विजयकुमार रेवडकर यांनी सांगितले.


Comments

Top