HOME   टॉप स्टोरी

आत्मदहन करायला आलेल्या शिऊरकरांना पोलिसांनी पाठवले परत!

दारु विकणारे म्हणतात नवर्‍याला सांभाळा, बारावीतली मुलंही झिंगू लागली, महिला आक्रमक


लातूर: पोलिसांना सांगून झालं, फौजदाराला विनंती करुन झाली, पोलिस निरीक्षकाला आणून दाखवलं, अधीक्षकांना निवेदन दिलं. उत्पादन शुल्क विभागाला विनंती करुन झाली, जिल्हाधिकार्‍यांना हात जोडून झाले मग आत्मदहनाचा इशारा दिला! आश्वासन मिळाल्यावर शांत झाले, पण दारु विक्री काही थांबेना आज अखेर शिऊर तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानोबा सूर्यवंशी गावातील महिलांना घेऊन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. आत्मदहनाचा निर्णय घेतला. पण यावेळी पोलिस अधिकार्‍यांनी केलेल्या यशस्वी हस्तक्षेपामुळं, घेतलेल्या समंजस भूमिकेमुळं या ग्रामस्थांनी नवे आश्वासन घेऊन निर्णय बदलला आणि गावाकडे रवाना झाले.
आज प्रजासत्ताक दिन. शिऊरकरांनी दारुबंदी आंदोलनासाठी हाच दिवस निवडला. यावेळी पोलिस आणि पत्रकारांशी बोलताना शिऊरकर अतिशय आक्रमक झाले होते. आत्मदहनाची खबर मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पण शिऊरकरांनी केलेले प्रयत्न आणि त्याला आलेले अपयश पाहून पोलिसही हतबल झाले. त्यांना मवाळ भूमिका घ्यावी लागली. शिऊर गावात २५ वर्षांपासून अवैध दारु विक्री केली जाते. या दारुने अनेकांचा प्राण घेतला आहे. दारुला विरोध करणार्‍या महिलांना धमकावले जाते. ५० मीटरवर शाळा असूनही दारु बिनबोभाट विकली जाते. सगळीकडे तक्रारी-विनंत्या करुन झाल्या पण कारवाई होत नसल्यानं अखेर आत्मदहनाचा निर्णय घ्यावा लागला. आत्मदहनासाठी आलेल्या महिला आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष सूर्यवंशी यांना पोलिसांनी मन मोकळं करु दिलं. शांतपणे दारु विक्री बंद करण्याचं आश्वास दिलं. काय प्रयत्न केले जातील याची माहिती दिली तेव्हा आंदोलक शांत झाले. लातूर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक माळी आणि पीएसआय सचिन इंगेवाड यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले. जशास तशी भूमिका घेतली असती तर आज प्रजासत्ताक दिनी नकीच अनर्थ ओढवला असता.


Comments

Top