HOME   टॉप स्टोरी

घाणीत शासकीय कॉलनी, जिल्हाधिकार्‍यांनी केली पाहणी

सगळ्यांनी मिळून कचरा करायचा साफ, मग होईल दुरुस्ती, जिल्हाधिकार्‍यांचा पर्याय


लातूर: लातुरच्या एमआयडीसी परिसरात असलेली शासकीय कॉलनी शहरात आहे की शहराबाहेर असा प्रश्न पडावा इतकी जवळीक या कॉलनीतीएल लोक आणि लातुरकरांची आहे. यामुळे या भागाकडे कुणाचेही फारसे लक्ष नसते. या कॉलनीजवळच जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक अशा बड्या अधिकार्‍यांची सरकारी निवासस्थाने आहेत. या कॉलनीत साधारणत: तीनशे क्टुंब राहतात. प्रचंड घाणीमुळे या कॉलनीत राहणे मुश्कील झाले आहे. रस्तेही तसेच देखणे आहेत. सरकारी कर्मचार्‍यांच्या वस्तीचे असे हाल होतात, त्यांची दाद कुणी घेत नाही. बांधकाम विभाग जबाबदार असताना तिकडूनही कुणी लक्ष द्यायला तयार नाही. या कॉलनीतल्या बहुतांश ठिकाणचे ड्रेनेज फुटले आहेत. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. याच खड्ड्यातून पिण्याच्या पाण्याचीही पाईपलाईन गेल्याने हे घाण पाणी त्या पाईपातून घरात येते. जिकडे पहावे तिकडे शेपटाच्या अळ्यांचा वावर आहे. एवढी सगळी घाण असल्याने डुकरांचाही बिनबोभाट वावर आहे. जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, आयुक्त, बांधकाम विभाग सगळीकडे चकरा मारुन झाल्या पण ही सरकारी कार्यालयं या सरकारी कॉलनीकडे पहायला तयार नाहीत. आज या कॉलनीतल्या लोकांनी उप महापौर देवीदास काळे यांना पाचारण केले, सोबत नगरसेविका रागिणी यादवही होत्या. काळे यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या कानावर ही बाब घातली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत तातडीने हजर झाले. त्यांनी या सरकारी कॉलनीतल्या सगळ्या ‘सौंदर्याची’ पाहणी केली. जागोजागी साचलेला कचराही त्यांनी पाहिला. बुधवारी या कॉलनीतल्या प्रत्येक घरातील एक व्यक्ती यानुसार सगळ्या घरातील लोकांनी जमावं, कॉलनीतला प्लास्टीकसह सगळा कचरा जमा करावा त्यानंतर मनपाच्या टीमला बोलावून फुटलेले पाईप, चोक झालेली चेंबर्स साफ केले जातील, गरज भासल्यास दुरुस्त केले जातील असे त्यांनी सांगितले. यावेळी कॉलनीतल्या महिला मोठ्या प्रमाणावर जमल्या होत्या. त्या सातत्याने तक्रारी करीत होत्या.


Comments

Top