HOME   टॉप स्टोरी

डुकराने फाडला चिमुकलीचा चेहरा, शरिरावर अनेक जखमा

दीपज्योतीनगरातला प्रकार, सरकारी दवाखान्यात मुलीवर उपचार, उदंड झाले डुकरे


लातूर: जंगली कुत्री, लांडगे यांनी प्राण्यांवर केलेले हल्ले आपण जाणतो, रानडुकरांचेही हल्ले होत असतात पण शहरातल्या डुकराने मुलीचा चेहरा फाडला अशा प्रकारची घटना कधी ऐकायला मिळाली नसेल. असा प्रकार लातुरात घडलाय. दीपज्योतीनगरमध्ये. या भागात पल्लवी परदेसी नावाची चार वर्षाची बालिका घराजवळील किराणा दुकानात बिस्कीटचा पुडा आणायला चालली होती. त्याचवेळी तीन ते चार फूट ऊंचीचे डुक्कर धावत आले आणि त्याने या बालिकेवर हल्ला केला. या हल्ल्यात या मुलीचा डावा चेहरा फाडला, लचके तोडले. या मुलीच्या शरिरावर अनेक जखमा आहेत. ही घटना पाहताच बाजुचे लोक पळत आले त्यांनी डुकराला हुसकावण्याचा प्रयत्न केला तरीही ते ऐकत नव्हते, त्या मुलीला सोडायला तयार नव्हते, अखेर सगळ्यांनी मिळून काठ्या घातल्या तेव्हा ते पळाले. स्थानिकांनी त्या मुलीला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे. या भागातील नगरसेविका रागिणी यादव, विशाल जाधव यावेळी रुग्णालयात उपस्थित होते. आपल्या प्रभागात डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. तो रोखावा अशी आपण अनेकदा विनंती केली पण कुणी लक्ष द्यायला तयार नाहीत असं त्या सांगतात. काही दिवसांपूर्वी यादव यांनी थेट जिल्हाधिकार्‍यांकडेही गार्‍हाणे मांडले होते. महापालिकेचे पदाधिकारी स्वत:तच मग्न असल्याने शहरात अशा गोष्टी घडत आहेत. नगरसेवकाला न विचारता प्रभागात कामे केली तर नगरसेवक अधिकार्‍यांना धारेवर धरतात. एकूणच मनपाचा मूड ‘वेगळा’ असल्याने यापुढेही अशाच घटना घडत राहणार असे काही नागरिक म्हणाले.


Comments

Top