HOME   टॉप स्टोरी

नवी लातूर-यशवंतपूर रेल्वे रवाना, पालकमंत्री-खासदारांनी दाखवला झेंडा

सीएसटीवर जागा नाही, तांत्रिक अडचण संपताच लातूर-मुंबई सुरु होणार


लातूर: लातूर-मुंबई रेल्वेच्या बलिदानातून येऊ घातलेली लातूर-यशवंतपूर रेल्वे आज सुरु झाली. दुपारी एक वाजता आपल्या स्थानकात येऊन थांबलेल्या या गाडीला पालकमंत्री संभाजी पाटील, खा. सुनील गायकवाड, आ. सुधाकर भालेराव यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. भाजपाचे स्थानिक नेतेही उपस्थित होते. गाडीच्या इंजिनवर पुढच्या बाजुला भारतीय जनता पार्टी लातूर जिल्हा या नावाने फलक लावला होता. त्यावर केंद्रातील वरिष्ठ नेते, पालकमंत्री पाटील, खा. गायकवाड आणि आ. भालेराव यांचे चेहरे झळकत होते. गाडीच्या पहिल्या फेरीला शंभरेक लोकांचा प्रतिसाद मिळाला.
लातूर हे शिक्षणाचे माहेरघर आहे. दक्षिणेतला मोठा आयटी हब बंगलोरला आहे. लातुरचा व्यापार दक्षिणेशी जोडला गेला आहे. शिक्षण आणि व्यापारासाठी ही रेल्वे महत्वाची ठरणार आहे असे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आजलातूरशी बोलताना सांगितले. यशवंतपूर आणण्यासाठी जसे आपण अथक प्रयत्न केले तसे प्रयत्न लातूर-मुंबई गाडी पुन्हा सुरु व्हावी यासाठी केव्हा प्रयत्न करणार? असा प्रश्न विचारला असता आपण, खासदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांना भेटलो आहोत. ही मागणी पुढे नेत आहोत. सुरेश प्रभू यांनी चार गाड्या लातुरला देण्याचे घोषित केले होते. आता इतर गाड्यांच्या माध्यमातून मुंबईला जाण्याची सोय झाली आहे. वेगळी सोडण्यासाठी सीएसटीवर जागा शिल्लक नाही. आवश्यक यंत्रणा तयार होईपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. सध्या पनवेल, ठाण्यापर्यंत स्टॉपेज मिळतोय. नवीन यंत्रणा तयार झाल्यानंतर आणखी एक स्वतंत्र गाडी मुंबईसाठी सोडली जाईल असे ते म्हणाले. यावेळी शैलेश लाहोटी, महापौर सुरेश पवार, उप महापौर देवीदास काळे, शैलेश गोजमगुंडे, शैलेश स्वामी, प्रकाश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, नगरसेवक सुनील मलवाड, नागनाथ निडवदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या गाडीने बंगलोर तिरुपतीला जाणार्‍यांची सोय झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते महादेव गोमारे यांनी त्याबद्दल आभार मानले. खा. सुनील गायकवाड आणि आ. सुधाकर भालेराव या पहिल्या गाडीत बसून गेले. कदाचित ते उदगीरला उतरतील. तिथेही गाडीचे स्वागत केले जाईल.


Comments

Top