HOME   टॉप स्टोरी

जनाधारकडे ऑडिट रिपोर्टच नाही, टेंडर दिलेच कसे?

नगरसेवक सचिन मस्के यांनी घातले मुख्य स्वच्छता निरीक्षकांच्या कार्यालयाला कुलूप!


लातूर: लातुरच्या कचरा नियोजनाचे काम जनाधार संस्थेकडे सोपवल्यापासून या व्यवस्थापनाबाबत ओरड होऊ लागली आहे. शहरात अजूनही जागोजागी कचर्‍याचे ढीग आढळतात, अनेक ठिकाणी कचरा उघडपणे सर्रास जाळला जातो. कचर्‍याबद्दल तक्रार करण्यासाठी मोबाईल अ‍ॅप सुरु करण्यात आले आहे. त्यावर आठ आठ दिवस तक्रार दिल्यानंतर कचरा जमवण्याचे काम करणाराच ते जाळून टाकतो. याचे दृश्य पुरावे आजलातूरने प्रसारितही केले होते. जनाधार संस्थेला कचरा नियोजनाचे काम दिल्यानंतर अनेक स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. कुणी म्हणतं हे काम तसंच देण्यात आलंय तर कुणी म्हणतं टेंडर भरताना जनाधारने तीन वर्षांचा लेखा अहवालच (ऑडीट रिपोर्ट) दिला नाही. कॉंग्रेसचे नगरसेवक सचिन मस्के यांनीही असाच आरोप केला आहे. त्यांनी मनपा प्रशासनाकडे याबाबतच्या कागदपत्रांची मागणी केली होती. ती मिळाली नाही. मग त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली धर्मादाय आयिक्तांकडे मागणी केली. धर्मादाय आयुक्तांनीही लेखा परिक्षण झाले नसल्याची कागदपत्रे दिली आहेत असे सचिन मस्के यांनी सांगितले. ऑडीट रिपोर्ट मिळेपर्यंत स्वच्छता निरीक्षकांना काम करु देणार नाही, कचरा डेपोला कुलुपं घातली जातील असा इशारा मस्के यांनी दिला आहे. दरम्यान या प्रकरणी आम्ही जनाधारचे प्रमुख संजय कांबळे यांच्याशी संपर्क साधून ऑडीटबाबत चौकशी केली असता, सर्व कागदपत्रे दिली आहेत. ऑडीट रिपोर्ट नसेल तर टेंडर कसे मंजूर होईल असा प्रश्न त्यांनी केला. याबाबत ज्या कुणा वरिष्ठांना उत्तर देण्यास आम्ही बांधील आहोत त्यांना उत्तर देऊ असे ते म्हणाले.


Comments

Top